टी20 विश्वचषक 2024 च्या 35 व्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडचा पराभव केला. ‘ब’ गटातील हा शेवटचा सामना होता. ऑस्ट्रेलियाच्या विजयासह इंग्लंडला सुपर 8 चं तिकीट मिळालं.
अशाप्रकारे ‘ब’ गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ सुपर 8 साठी पात्र ठरले आहेत, तर स्कॉटलंड, नामिबिया आणि ओमानचे संघ स्पर्धेतून बाहेर पडले. स्पर्धेच्या ‘अ’ गटातून पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड हे संघ बाहेर पडले आहेत, तर ‘क’ गटातून न्यूझीलंड, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी हे संघ सुपर 8 साठी पात्र ठरू शकले नाहीत. ‘ड’ गटातून नेपाळ आणि श्रीलंका हे संघ पात्रतेच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
आतापर्यंत एकूण 7 संघांनी सुपर 8 मध्ये स्थान मिळवलं आहे. यामध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. तर बांग्लादेश आणि नेदरलँड्स यांच्यापैकी एक संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात स्कॉटलंड संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलिया करू शकणार नाही, असं वाटत होतं. यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांची धाकधूक वाढली होती. मात्र अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे स्कॉटलंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आणि इंग्लंडचा संघ सुपर 8 साठी पात्र ठरला.
ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड (68) आणि मार्कस स्टॉयनिस (59) यांनी अर्धशतकं झळकावली. तर स्कॉटलँडकडून प्रथम फलंदाजी करताना ब्रँडन मॅकमुलेन यानं 34 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 60 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजीत ग्लेन मॅक्सवेलनं 2 विकेट घेतल्या. या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे, ज्यांनी साखळी फेरीतील आपले चारही सामने जिंकले.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबरपासून रिजवानपर्यंत, सगळ्यांचे पगार कापणार पीसीबी! पाकिस्तानी खेळाडूंवर बोर्ड नाराज
टी20 विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती, दोन देशांकडून खेळला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट
या ‘तीन’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंची कारकीर्द संपली! यापुढे संघात स्थान मिळणे कठीण