मुंबई । ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स कॅरीच्या जबरदस्त खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या वनडे सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवून दिला. यासह ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर पराभूत करत पाच वर्षांनंतर वनडे मालिका विजय मिळवला.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 7 विकेट गमावून 303 धावांचे आव्हान दिले होते, त्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दोन चेंडू शिल्लक असताना 305 धावा केल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाने त्याचे सात गडीही गमावले होते. ऑस्ट्रेलियाकडून 50 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मिशेल स्टार्कने चौकार ठोकला आणि सामना जिंकण्याबरोबरच मालिकाही ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली.
ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 108 तर अलेक्स कॅरीने 106 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक कॅरीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील हे पहिले शतक आहे. संघासाठी दिलेल्या योगदानाच्या बाबतीत मॅक्सवेल आणि कॅरी यांच्यात फक्त दोन धावांचा फरक होता, परंतु मॅक्सवेलने 120 च्या सरासरीने धावा केल्या, तर कॅरीचे सरासरी फक्त 92.98 होती.
इंग्लंडकडून 303 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्या ऑस्ट्रेलिया संघाला पहिला झटका केवळ 21 धावांवर बसला होता. ऍरोन फिंच अवघ्या 9 चेंडूत 12 धावा करुन बाद झाला. त्याच्या खेळीत त्याने दोन चौकार ठोकले. संघाची दुसरी विकेटही 31 धावांवर पडली. मार्कस स्टोइनिस चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट 51धावांवर, चौथी विकेट 55 धावांवर आणि पाचवी विकेट 73 धावांवर पडली. अशी बिकट परिस्थिती असतानाही ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स कॅरी यांनी शतकी धमाका केला. त्या दोघांनी 6 व्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी केली.
इंग्लंडलाही 303 धावांचे विशाल लक्ष्य देऊन पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीच्या मदतीने खराब सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन केले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने मिशेल स्टार्कच्या पहिल्या दोन चेंडूत दोन गडी गमाविले. पण बेअरस्टोने 126 चेंडूंत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 112 धावा फटकावल्या आणि सॅम बिलिंग्ज 58 चेंडूंत 56 धावा केल्या.
ख्रिस वोक्सने (39 चेंडूंत नाबाद 53) पुन्हा अखेरच्या षटकात चांगल्या धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर ऍडम जॅम्पाने 51 धावा देऊन तीन गडी बाद केले. सुरुवातीच्या यशानंतर स्टार्क प्रभाव पाडण्यात अयशस्वी झाला. त्याने तीन विकेट्स घेतल्या, पण त्यासाठी 74 धावा मोजल्या. स्टार्कच्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर जेसन रॉयने ग्लेन मॅक्सवेलकडून पॉइंटवर झेलबाद केले, तर पुढच्याच चेंडूवर त्याने जो रूटला पायचीत केले. मॉर्गनने स्टार्कला हॅटट्रिकची संधी दिली नाही, परंतु क्रीजवर बराच वेळ घालवूनही तो मोठा डाव खेळू शकला नाही.
जॅम्पाने 11 व्या षटकात चेंडू हाती घेतला आणि त्याच्या दुसर्या चेंडूवर मॉर्गन 23 धावांवर बाद झाला त्यामुळे त्याची बेअरस्टोबरोबरची 67 धावांची भागीदारी संपुष्टात आली. मालिकेच्या तिसर्या सामन्यात जोस बटलर(8) दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरला. बेअरस्टोने दुसर्या बाजूने संघाचा डाव सावरला होता. शतक ठोल्यानंतर त्याने थोडासा वेग कमी केला.
त्यानंतर कमिन्सने 41 व्या षटकात आपल्या वेगामध्ये परिवर्तन करत एका शानदार चेंडूवर बेअरस्टोची दांडी गुल केली आणि ऑस्ट्रेलियाला डेथ ओव्हर्समध्ये यश मिळवून दिले. त्यानंतर ख्रिस वोक्सने जबाबदारी घेत डाव सावरला त्याने सहा चौकार ठोकत आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. तर टॉम करनने 19 धावांचे योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडने तिसर्या व निर्णायक वनडे सामन्यात सात बाद 302 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. परंतु मॅक्सवेल आणि कॅरीच्या शतकी धमाक्यापुढे हे आव्हान लहान ठरले.
या सामन्यापूर्वी ही मालिका 1-1 अशी बरोबरीत होती.