भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे भलतीच चर्चेत आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चर्चेत येण्यामागील कारण ठरलं आहे ऑस्ट्रेलियन ओपनमधील तिचा पराभव. सानिया तिच्या कारकीर्दीच्या शेवटच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत खास कामगिरी करू शकली नाही. रविवारी (दि. 22 जानेवारी) सानिया आणि तिची सहकारी ऍना डेनिलिना या महिला दुहेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत पराभूत झाल्या. त्यामुळे या स्पर्धेतून त्या बाहेर पडल्या.
आठव्या मानांकित सानिया मिर्झा आणि ऍना डेनिलिना (Sania Mirza And Anna Danilina) यांना एलिसन व्हॅन उत्वेंक (बेल्जियम) आणि एनहेलिना कलिनिना (युक्रेन) या जोडीने दोन तास एक मिनिटे चाललेल्या या सामन्यात 4-6, 6-4, 2-6ने पराभूत केले. पहिल्या राऊंडमध्ये सानिया आणि ऍना यांंनी डालमा गल्फी आणि बर्नार्डा पेरा यांना पराभूत केले होते. मात्र, दुसऱ्या फेरीत त्यांना पहिल्या फेरीसारखी कामगिरी करण्यात यश आले नाही.
The last dance 🧚🏽♀️💜🎾 @AustralianOpen @WTA pic.twitter.com/mR6omkQjB2
— Sania Mirza (@MirzaSania) January 22, 2023
सानिया आणि डेनिलिना पहिल्या सेटमध्ये खास कामगिरी करू शकल्या नाहीत. त्यांना हा सेट गमवावा लागला. दुसऱ्या सेटमध्येही एकेवेळी सानिया-डेनिलिना 0-3ने पिछाडीवर होत्या, परंतु त्यानंतर सानिया आणि डेनिलिना यांनी पुनरागमन करत सलग तीन सेट जिंकले. सातव्या सेटमध्ये दोघींनीही विरोधी संघाच्या खेळाडूंना सर्व्हिस तोड दिली, जेव्हा कलिनिना आणि व्हॅनचा फोरहँड शॉट वाईड निघून गेला. त्यानंतर सानिया आणि डेनिलिना यांनी दुसरा सेट जिंकला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये सानिया आणि डेनिलिना यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता न आल्याने त्यांची सर्व्हिस तीन वेळा तुटली.
सानिया- बोपन्नाच्या मिश्र दुहेरी गटाकडून अपेक्षा कायम
सानिया मिर्झासाठी आता फक्त मिश्र दुहेरी गटातील आव्हान बाकी आहे. यामधील तिचा सहकारी रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) आहे. सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना (Sania Mirza And Rohan Bopanna) मिश्र दुहेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. सानिया-रोहनने पहिल्या राऊंडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जेमी फोरलिस आणि ल्यूक सेविल यांना सरळ सेटमध्ये 7-6, 6-3ने मात दिली. आता दुसऱ्या फेरीत सानिया- रोहन यांचा सामना सोमवारी (दि. 23 जानेवारी) एरियल बेहार आणि माकोटो निनोमिया यांच्याविरुद्ध होणार आहे.
सानियाच्या नावावर सहा ग्रँड स्लॅमचे किताब
सानिया मिर्झा (Sania Mirza) ही तिची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळत आहे. सानियाने या महिन्यातच निवृत्तीची घोषणा केली होती. सानियाची गणना भारताच्या सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंमध्ये केली जाते. सानियाने तिच्या कारकीर्दीत एकूण 6 ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत. त्यातील तीन हे महिला दुहेरी आणि तीन मिश्र दुहेरी किताब आहेत. तिने तिचा शेवटचा ग्रँड स्लॅम 2016मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमार्फत जिंकला होता. मात्र, त्यानंतर सानिया एकही ग्रँड स्लॅम जिंकू शकली नाहीये. (australian open 2023 india star tennis player sania mirza loses in 2nd round team)
सानियाच्या ग्रँड स्लॅम किताबांची यादी
1. ऑस्ट्रेलियन ओपन (2009)- मिश्र दुहेरी
2. फ्रेंच ओपन (2012)- मिश्र दुहेरी
3. यूएस ओपन (2014)- मिश्र दुहेरी
4. विम्बल्डन (2015)- महिला दुहेरी
5. यूएस ओपन (2015)- महिला दुहेरी
6. ऑस्ट्रेलियन ओपन (2016)- महिला दुहेरी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लगीनघाई! राहुल अन् अथियाच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओ व्हायरल; खंडाळ्यात किती वाजता घेणार सात फेरे?
फिटनेसमध्ये विराटपेक्षा कमी नाही फाफ, एसए20 लीगमधील पठ्ठ्याचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल