ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शुक्रवार, 30 जानेवारी रोजी पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराजने (Carlos Alcaraz) अलेक्झांडर ज्वेरेव्हचा (Alexander Zverev) पराभव केला. अशा प्रकारे अल्काराजने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. 5 तास आणि 27 मिनिटे चाललेल्या या ऐतिहासिक सामन्यात अल्काराजने कमालीची कामगिरी केली. विजयानंतर त्याने आपला आनंदही व्यक्त केला आहे.
22 वर्षांच्या अल्काराजने दुखापत असूनही ज्वेरेव्हला 6-4, 7-6(5), 6-7(3), 6-7(4), 7-5 असे पराभूत केले. सामन्यादरम्यान त्याला दुखापतही झाली होती, परंतु जखमी झाल्यानंतर त्याने आपल्या कमकुवतपणालाच ताकद बनवले आणि उपांत्य फेरीच्या ऐतिहासिक सामन्यात विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. 5 सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात अखेर कार्लोस अल्काराजचा विजय झाला आणि तो आपल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात अल्काराजचा सामना दोन वेळचा गतविजेता जानिक सिनर किंवा 24 वेळा मेजर विजेता नोव्हाक जोकोविच यांच्याशी होईल.
विजयानंतर अल्काराज म्हणाला की, मी नेहमी सांगतो की, काहीही झाले तरी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करत असाल किंवा कोणत्याही परिस्थितीतून जात असाल, तुम्हाला प्रत्येक क्षणी स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. तिसऱ्या सेटच्या मध्यंतरात मी संघर्ष करत होतो. शारीरिकदृष्ट्या, माझ्या छोट्या कारकिर्दीत खेळलेल्या सर्वात कठीण सामन्यांपैकी हा एक होता, पण मी अशा परिस्थितीतून आधीही गेलो आहे.
विशेष म्हणजे, जर अल्काराज अंतिम सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर पुरुष एकेरीमध्ये सर्वात कमी वयात ‘करिअर ग्रँड स्लॅम’ पूर्ण करणारा तो खेळाडू ठरेल.






