भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील अव्वल दर्जाच्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडे फलंदाजीचं खास कौशल्य होतं. त्याला बाद करणे कोणत्याही गोलंदाजासाठी अवघड बाब असे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या एका फिरकीपटूने सचिनला त्रिफळाचित केले होते आणि त्यानंतर हा क्षण स्मरणात राहावा म्हणून त्याने सचिनचा ऑटोग्राफ घेतला होता. विशेष म्हणजे सचिनने ऑटोग्राफ देताना त्याच्यासाठी खास संदेशही लिहीला होता, जो भविष्यात खराही ठरला.
ऑस्ट्रेलियाने केल्या 290 धावा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 ऑक्टोबर 2007 रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये वनडे मालिकेचा तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 290 धावा केल्या होत्या.
ब्रॅड हॉगने सचिनला केले बाद
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 291 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर सलामीला आले होते. डावाच्या 27 व्या षटकांत फिरकीपटू ब्रॅड हॉगने सचिनला त्रिफळाचित केले होते.
हॉगला हवा होता सचिनचा ऑटोग्राफ
सचिनला बाद केले त्या क्षणाचे छायाचित्र हॉगकडे होते. सामना संपल्यानंतर त्या छायाचित्रावर ऑटोग्राफ घेण्यासाठी हॉग सचिनकडे गेला.
‘असं पुन्हा कधीही होणार नाही’-सचिन तेंडुलकर
सचिनने अगदी साधेपणाने त्यावर ऑटोग्राफ दिला, परंतु ऑटोग्राफ देताना असेही लिहिले की आता पुढच्या वेळी हॉग पुन्हा कधीही त्याला बाद करू शकणार नाही.
त्यावेळी हॉगने द संडे एज या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले होते की, “मी त्या सामन्यात त्याला बाद केले व त्यानंतर त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गेलो. त्याने मला ऑटोग्राफ दिला आणि माझ्यासाठी एक संदेशही लिहिला.”
सचिनने ऑटोग्राफ देताना लिहिले की, “असं पुन्हा कधी होणार नाही.”
ऑटोग्राफ होता मौल्यवान -हॉग
“ऑटोग्राफ माझ्यासाठी खूप मौल्यवान होता. सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूबरोबर खेळणे हा सन्मान आहे. त्यांना गोलंदाजी करणे हा एक चांगला अनुभव आहे. त्याचा सामना करण्यासाठी मी गोलंदाजी केली.” असेही पुढे बोलताना हॉग म्हणाला
ऑटोग्राफमध्ये सचिनने लिहिलेल्या गोष्टी भविष्यात अचूकपणे समोर आल्या आणि त्यानंतर हॉगने सचिनला कधीही बाद केले नाही.
भारताचा झाला पराभव
भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने शतक ठोकूनही त्या सामन्यात भारताला 47 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट-स्मिथची नजर सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमावर, कोण मारणार बाजी?
भारताकडे बुमराह आणि शमी असेल, तर आमच्याकडे कमिन्स, स्टार्क आहेत, पाहा कोण म्हणतंय
आयसीसीचा मोठा निर्णय! १५ वर्षांखालील क्रिकेटर्स खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट