वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी२० विश्वचषकातील ३८ वा सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया संघाने आठ गडी राखून सामना सहज खिशात घातला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी विश्वास व्यक्त केला आहे की त्यांचा संघ या आठवड्यात टी२० विश्वचषकात पाकिस्तानसोबतच्या उपांत्य फेरीच्या लढतीत जगातील सर्वोत्तम संघ म्हणून स्वत:ला पुन्हा प्रस्थापित करू शकेल.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ होता आणि आम्ही पुन्हा सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जस्टिन लँगर म्हणाले, “आम्ही आता या टी२० स्पर्धेतून चांगले धडे घेतले आहेत. या स्पर्धेत झालेल्या प्रत्येक सामन्यातून आम्ही शिकलो आहोत. त्यामुळे या टी२० स्पर्धेत पुढे जाणे सुरू ठेवू.”
लँगर पुढे म्हणाले, “वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना शानदार होता, मला वाटते की आम्ही शेवटच्या काही सामन्यात खूप उत्कृष्ट क्रिकेटचे प्रदर्शन केले आहे. आमचा संघ खरोखरच चांगली कामगिरी करून पुढे आला आहे. इंग्लंडविरुद्धचा आमचा अनुभव खूपच गंभीर होता. आम्हाला माहित होते की, आम्हाला काही बाबतीत काम करावे लागेल आणि आमच्या खेळाडूंनी ज्या प्रकारे प्रतिसाद दिला ते खरोखरच खूप उत्कृष्ट होते. त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचणे खुप आनंददायक आहे. टी२० विश्वचषकात पाकिस्तानसोबतच्या उपांत्य फेरीच्या लढतीत जगातील सर्वोत्तम संघ म्हणून आम्ही स्वत:ला पुन्हा प्रस्थापित करू.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर वेस्ट इंडिजने धमाकेदार सुरुवात केली. सलामीवीरांनी अवघ्या १४ चेंडूत ३० धावा केल्या. पण ही भागीदारी पॅट कमिन्सने ख्रिस गेलला (१५) बाद करून तोडली. पुढच्याच षटकात जोश हेझलवूडने निकोलस पूरन (४) आणि रोस्टन चेस (०) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अॅडम झाम्पाने एविन लुईसची (२९) विकेट घेतली. त्याचवेळी शिमरॉन हेटमायरला (२७) बाद करून हेझलवूडने पाचवा धक्का बसला. शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा ड्वेन ब्राव्हो फार काही करू शकला नाही आणि १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार कायरण पोलार्डने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३१ चेंडूत ४४ धावा केल्या.
वेस्ट इंडिजने दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार अॅरॉन फिंच (९) डावाच्या चौथ्या षटकात अकील हुसेनचा बळी ठरला. पण यानंतर डेविड वॉर्नरने मिचेल मार्शसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७५ चेंडूत १२४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, लक्ष्य गाठण्यापूर्वीच ख्रिस गेलने मार्शची (५३) विकेट घेतली. सलामीवीर डेविड वॉर्नरने ५६ चेंडूत नाबाद ८९ धावांची खेळी केली.