भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु आहे. या हंगामात आत्तापर्यंत अनेक सामने रोमांचक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण याबरोबरच मैदानात जरी जंगी लढती होत असल्या तरी सामन्यांनतर खेळाडूंमध्ये असलेली मैत्रीही पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर अनेक युवा क्रिकेटपटू काही दिग्गज क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या बॅटवर आणि जर्सीवर घेताना दिसून आले आहे. नुकतेच असेच एक दृश्य रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात मंगळवारी(२७ एप्रिल) झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाले.
मंगळवारी बेंगलोर आणि दिल्लीत झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत पाहायला मिळाली. अखेर बेंगलोरने १ धावेने हा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली.
या सामन्यात अनेक खेळाडूंकडून चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. त्यातील अवेश खान या दिल्लीच्या गोलंदाजाचाही समावेश आहे. त्याने त्याच्या ४ षटकात केवळ ६ ची इकोनॉमी ठेवत २४ धावा देऊन बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. केवळ या सामन्यातच नाही तर गेल्या अनेक सामन्यात अवेश खानने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
सामन्यात जरी तो दिग्गज खेळाडूंना बाद करत असला तरी सामन्यानंतर मात्र तो या खेळाडूंचा आदर करतानाही दिसला. त्याने बेंगलोरविरुद्धच्या सामन्यानंतर विराट, एबी डिविलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल या तीन बेंगलोरच्या दिग्गज खेळाडूंची स्वाक्षरी आपल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या जर्सीवर घेतली.
अवेशचा स्वाक्षरी घेतानाचे फोटो बेंगलोरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच या फोटोंना बेंगलोरने कॅप्शन दिले आहे की ‘तुम्ही क्रिकेटपटूला बेंगलोर संघातून दूर घेऊन जाऊ शकता, पण त्या क्रिकेटरटूमधील आरसीबीयन (बेंगलोर चाहत्याला) नेऊ शकत नाही. अवेश, तू खूप दुरचा प्रवास केला आहेस, तुझी गोलंदाजी उत्तम होत आहे.’
https://twitter.com/RCBTweets/status/1387141658202968066
अवेशचे बेंगलोरकडून झाले होते पदार्पण
अवेशने आयपीएलमध्ये २०१७ साली पदार्पण केले होते. विशेष म्हणजे २०१७ आयपीएल हंगामात त्याने बेंगलोर संघाकडून दिल्ली विरुद्ध पदार्पण केले होते. पण त्यानंतर गेल्या ३ हंगामापासून अवेश दिल्ली संघाचा भाग आहे. त्याने यंदाच्या १४ व्या आयपीएल हंगामात आत्तापर्यंत ६ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सध्या तो या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
यापूर्वी रोहितचीही घेतली स्वाक्षरी
अवेशने यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतरही मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची स्वाक्षरी आपल्या जर्सीवर घेतली होती. त्यावेळी त्या क्षणाचा फोटोही प्रचंड व्हायरल झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्ली कॅपिटल्सचा ‘विभीषण’! सिराजला महत्त्वाचा मंत्र सांगितला अन् बेंगलोरने ‘रॉयल’ विजय मिळवला
CSKvSRH: धोनी पुन्हा गाठणार अव्वलस्थान की वॉर्नर मिटवणार लुजरचा टॅग; पाहा कोणाचे पारडे आहे जड?






