आयपीएल 2019 ची स्पर्धा रंगायला सुरुवात झाली आहे. पण या स्पर्धेच्या सुरुवातीलाच मंकडींग प्रकरण चांगलेच गाजले होते. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलरला मंकडींग करुन बाद केले होते.
त्यामुळे यावर बरीच चर्चा रंगली. अनेकांनी अश्विनचे कृत्य खेळाडूवृत्तीचे नव्हते असे म्हटले आहे. तर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे.
पण त्या प्रकरणानंतर मात्र फलंदाज जास्तीची खबरदारी घेत आहेत. याचाच प्रत्यय सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबादमध्ये झालेल्या सामन्यात आला आहे.
या सामन्यात हैद्राबादचा धडाकेबाद फलंदाज डेव्हिड वॉर्नर नॉन स्ट्रायकर एन्डला असताना अश्विनच्या गोलंदाजीवेळी स्वत:ची बॅट क्रिजमध्येच राहिल याची काळजी घेताना दिसला आहे. याचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की सामन्यातील 6 व्या षटकात अश्विन गोलंदाजी करत असताना वॉर्नर नॉन स्ट्रायकर एन्डला होता. त्यावेळी अश्विन जसा चेंडू टाकण्यासाठी स्टंपजवळ आला तसे लगेचच वॉर्नरने त्याची बॅट क्रिजच्या आत टेकवली.
No, Warner doesn't want to get 'Mankaded' https://t.co/DUSt66yf3I via @ipl
— Utkarsh Bhatla (@UtkarshBhatla) April 8, 2019
या सामन्यात वॉर्नरने 62 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली. हे त्याचे आयपीएलच्या 12 व्या मोसमातील चौथे अर्धशतक आहे. मात्र वॉर्नरचे या सामन्यातील हे अर्धशतक त्याचे आयपीएलमधील सर्वात धीम्यागतीचे अर्धशतक ठरले आहे. त्याने 49 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.
याआधीचे त्याचे धीम्यागतीचे अर्धशतक देखील पंजाबच्या विरुद्धच झाले होते. त्याने 2017ला पंजाब विरुद्ध 45 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
वॉर्नरने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 150 धावा केल्या आणि पंजाबसमोर 151 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबलाही शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला.
पण अखेर केएल राहुलने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव काढत पंजाबला 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. पंजाबकडून राहुलने 53 चेंडूत नाबाद 71 धावांची आणि मयंक अगरवालने 43 चेंडूत 55 धावांची खेळी करत पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
गोलंदाजीमध्ये पंजाबकडून मुजीब उर रेहमान, मोहम्मद शमी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. तर हैद्राबादकडून संदीप शर्माने दोन विकेट, राशिद खान आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
–प्रो कबड्डी लिलावात सलग दुसऱ्यांदा हा खेळाडू झाला करोडपती
–त्या दोन नो बॉलनंतर धोनीच्या प्रतिक्रियेबद्दल दीपक चहरने केला खूलासा






