इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली सध्या चर्चेत आहे. इंग्लंडच्या कसोटी संघात मोईन पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा काही काळापासून सुरू आहेत. अशातच आता मोईन आणि त्याच्या चाहत्यांना आणखी एक गोड बातमी मिळाली आहे. मोईनला त्याच्या क्रिकेटमधील योगदानासाठी इंग्लंडमध्ये एका विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.
मोईन अली ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर’ हा पुरस्कार मिळणार आहे आणि त्यासाठी त्याचे नाव क्वीन्सच्या प्लॅटिनम ज्युबिली लिस्टमध्येही समाविष्ट करण्यात आले आहे. या वृत्ताला आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता मोईनचा केवळ सन्मान होणे बाकी राहिले आहे. याबाबत मोईनने स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.
मोईन म्हणाला की, “क्रिकेटने मला माझ्या आयुष्यात खूप काही दिले आहे. मला अभिमान आहे की, मी हा खेळ खेळला आणि जगाच्या कानाकोपऱ्यात खेळाचा आनंद घेतला. हा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.” शिवाय “माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला नसता, तर क्रिकेट खेळणे आणि आता हा सन्मान मिळवणे माझ्यासाठी कधीच सोपे झाले नसते. मी माझ्या कुटुंबाचा सदैव ऋणी राहीन. या सन्मानासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही मोईनला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत,” असे म्हणत मोईनने त्याच्या परिवाराचे विशेष आभार मानले आहेत.
मोईनने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, जेव्हा ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंड संघाचे प्रशिक्षक झाले आहेत, तेव्हापासून मोईनच्या पुनरागमनाच्या चर्चांना उधानं आलं आहे. मात्र, “इंग्लंड संघात सध्या खेळत असलेल्या जॅक लीच या अष्टपैलू खेळाडूच्या करिअरमध्ये अडचण येऊ नये. यासाठी आपण परत येऊ इच्छित नाही, पण जेव्हा वाटेल, तेव्हा पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्यास उपलब्ध होऊ शकतो,” असे आश्वासन मोईनने दिले आहे.
मोईनची कसोटी कारकीर्द
मोईनच्या कसोटी कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ६४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १११ डावांमध्ये फलंदाजी करताना २८.२९च्या सरासरीने २९१४ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने ११२ कसोटी डावात गोलंदाजी करताना ३.६१च्या इकॉनॉमी रेटने १९५ विकेट्स घेतल्या आहेत.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
IPL 2023मध्ये ‘हे’ ३ बदल करत सीएसके करणार दमदार पुनरागमन, दुसरा बदल खूपच महत्त्वाचा
‘या’ ५ गोष्टी घडल्यामुळे पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सने जिंकली IPL 2022ची ट्रॉफी
प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढत असा मिळवला हार्दिकच्या गुजरात टायटन्सने IPL 2022चा मुकूट