अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामना भारताने १० विकेट्सने दोन दिवसात जिंकला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ‘लोकलबॉय’ अक्षर पटेल ठरला. त्याने या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना ११ विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर त्याने मुलाखत देताना त्याच्या एका टोपन नावाचा खुलासा केला आहे.
खरंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यष्टीमागून अक्षरला ‘वसिम भाई, वसिम भाई’ असे म्हणत होता. त्यामुळे तो अक्षरला वसिम का म्हणतोय हा प्रश्न अनेकांना पडला होता. याचमुळे सामना संपल्यानंतर मॅच प्रसेंटेशनमध्ये मुरली कार्तिकने त्याला विचारले की पंत त्याला ‘वसिम भाई’ असं का म्हणत आहे.
त्यावर अक्षरने खुलासा केला की खरंतर हे नाव अजिंक्य रहाणेने त्याला दिले आहे आणि रिषभने हे नाव प्रसिद्ध केले आहे. अक्षर म्हणाला, ‘ते मला वसिम भाई म्हणत आहेत, कारण त्यांना वाटते की माझा आर्म बॉल हा वसिम आक्रम यांच्या प्रमाणे घातक आहे. अज्जू भाईने (अजिंक्य रहाणे) मला हे नाव दिले आणि पंतने ते पुढे चालू ठेवले. मला अशीच खेळपट्टी चौथ्या सामन्यातही असलेली आवडेल आणि मला विकेट्स घ्यायलाही आवडेल.’
हा सामना अहमदाबादच्या पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटचा सामनाही याच स्टेडियमवर होणार आहे.
अक्षरची घरच्या मैदानातील कामगिरी
विशेष म्हणजे अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम अक्षरचे घरचे मैदान आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना आणखी खास आहे. या सामन्यात अक्षरने पहिल्या डावात जॅक क्रॉली, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना बाद केले. तर दुसऱ्या डावाची सुरुवात त्याने जबरदस्त केली. त्याने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात जॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टो यांना त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याने डॉमनिक सिब्ली, जो रुट आणि बेन फोक्स यांना बाद करत या डावातील ५ विकेट्स पूर्ण केल्या.
अक्षरने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ५ अशा मिळून ११ विकेट्स घेतल्याने तो या सामन्याच्या सामनावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
पीटरसन पुन्हा दिसणार कर्णधाराच्या भूमीकेत, ‘या’ स्पर्धेत करणार इंग्लंडचे नेतृत्व
‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ साठी इंडिया लिजेंड्स संघाची घोषणा; सचिन तेंडुलकरसह ‘या’ दिग्गजांचा समावेश