अहमदाबाद येथे सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मुंबईच्या आयुष म्हात्रेनं कमाल केली आहे. या युवा फलंदाजानं धमाकेदार शतक झळकावलं. त्यानं 93 चेंडूत 148 धावा केल्या त्याच्यासोबत जय बिश्टानं 45 धावांचं योगदान दिलं. या दोघांच्या खेळीच्या जोरावर श्रेयश अय्यरच्या संघानं 289 धावांचं लक्ष्य अवघ्या 46 षटकात गाठलं. या सामन्यात मुंबईनं सौराष्ट्रावर 5 गडी राखून विजय मिळवला. मुंबईचा हा सलग तिसरा विजय आहे.
या सामन्यात सौराष्ट्रनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 50 षटकांत 289 धावा केल्या. सौराष्ट्रकडून विश्ववर्धन जडेजानं 98 धावांची तर चिराग जानीनं 83 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. मुंबईचा फिरकी गोलंदाज सुर्यांश शेडगेनं 4 विकेट्स घेत सौराष्ट्रला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं.
यानंतर मुंबईचा संघ 289 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला. संघाकडून 17 वर्षीय आयुष म्हात्रेनं आपल्या स्फोटक फलंदाजीनं सौराष्ट्रच्या गोलंदाजांची झोप उडवली. आयुषनं सलामीवीर बिश्टासोबत अवघ्या 17.4 षटकांत 141 धावांची जबरदस्त शतकी भागीदारी केली. बिश्टा बाद झाल्यानंतर सौराष्ट्रचे गोलंदाज कमबॅक करतील असं वाटत होतं, परंतु तसं झाल नाही. आयुषनं आपली स्फोटक फलंदाजी चालूच ठेवली.
आयुषनं आपलं शतक अवघ्या 67 चेंडूत पूर्ण केलं. तो 30व्या षटकात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला, आऊट होण्यापूर्वी त्यानं केवळ 93 चेंडूत 148 धावांची अप्रतिम खेळी खेळली. त्यानं आपल्या खेळीत 13 चौकार आणि 9 षटकार मारले. आयुषचं या स्पर्धेतील हे दुसर शतक असून त्यानं याआधी नागलँड विरुद्ध 181 धावांची दमदार खेळी खेळली होती.
हेही वाचा –
आता कसोटी क्रिकेट नव्या पद्धतीनं खेळलं जाणार, बदलू शकतात अनेक नियम!
“रोहित शर्मानं आता कॉमेडियन व्हावं”, हिटमॅनच्या खराब कामगिरीनंतर माजी खेळाडूची टीका
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूंचे होणार कमबॅक!