पाकिस्तानचा 2024 टी20 विश्वचषकातील प्रवास संपला आहे. संघानं त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात आयर्लंडवर 3 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह पाकिस्ताननं ‘अ’ गटात 4 गुणांसह तिसरं स्थान पटकावलं.
पाकिस्तानच्या विजयात कर्णधार बाबर आझमचा मोलाचा वाटा राहिला. त्यानं या सामन्यात संथ पण अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली. या खेळीदरम्यान बाबरनं एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला. त्यानं या बाबतीत महेंद्रसिंह धोनी आणि केन विल्यमसन यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.
आयर्लंडविरुद्ध बाबर आझमनं 34 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीनं 32 धावा केल्या. या दरम्यान त्यानं टी20 विश्वचषकाच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. महेंद्रसिंह धोनीनं टी20 विश्वचषकात कर्णधार म्हणून 29 डाव खेळताना 529 धावा केल्या आहेत. आता बाबर त्याच्या पुढे गेला असून त्यानं केवळ 17 डावात 549 धावा केल्या आहेत.
या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर आहे. विल्यमसननं टी20 विश्वचषकात आतापर्यंत 19 डाव खेळत 527 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा महेला जयवर्धने चौथ्या स्थानावर आहे. जयवर्धनेनं टी20 विश्वचषकात श्रीलंकेचं नेतृत्व करताना 11 डावात 360 धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ आहे, ज्यानं कर्णधार म्हणून टी20 विश्वचषकात 16 डावात 352 धावा केल्या आहेत.
टी20 विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा
549 – बाबर आझम (17 डाव)
529 – महेंद्रसिंह धोनी (29 डाव)
527 – केन विल्यमसन (19 डाव)
360 – महेला जयवर्धने (11 डाव)
352 – ग्रॅम स्मिथ (16 डाव)
न्यूझीलंडला या विश्वचषकात पापुआ न्यू गिनीविरुद्ध एक सामना खेळायचा आहे. अशा स्थितीत त्या सामन्यात विल्यमसनकडे बाबर आझमला मागे टाकण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“बाबर आझमनं टी20 क्रिकेट खेळू नये…” भारताच्या माजी खेळाडूनं दिला सल्ला
“वादळ येण्यापूर्वीची शांतता…” कोहलीच्या फाॅर्मबद्दल ‘या’ दिग्गज खेळाडूनं दिली भन्नाट प्रतिक्रिया
सुपर 8 मध्ये भारताला ‘या’ दोन संघांपासून सावध राहावं लागेल, माजी खेळाडूचा इशारा