कराची। ऑस्ट्रेलिया संघ सध्या २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना कराची येथील नॅशनल स्टेडियमवर पार पडला. अनिर्णित राहिलेल्या या सामन्यातील अखेरच्या डावात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने शानदार दीडशतकी खेळी करताना अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Pakistan vs Australia) ५०६ धावांचे मोठे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझमने (Babar Azam) ४२५ चेंडूत २१ चौकार आणि १ षटकार मारताना १९६ धावा केल्या. त्याला कारकिर्दीतील पहिले द्विशतक करण्यासाठी केवळ ४ धावा हव्या असताना नॅथन लायनने मार्नस लॅब्यूशानेच्या हातून झेलबाद केले. पण असे असले तरी आझमसाठी ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध १४३ धावांची खेळी केली होती.
दिग्गजांच्या यादीत आझम सामील
आझमने १९६ धावांची खेळी केल्याने त्याचे नाव मोठ्या विक्रमांच्या यादीत आले आहे. तो कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आला आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या चौथ्या डावात सर्वोच्च खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. या यादीत त्याने कुमार संगकाराला मागे टाकले आहे.
कुमार संगकाराने (Kumar Sangakkara) २००७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात १९२ धावांची खेळी केली होती. तसेच १९०-१९९ या दरम्यान कसोटीच्या चौथ्या डावात बाद होणारे हे दोनच क्रिकेटपटू आहेत.
कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वोच्च खेळी करणारे फलंदाज
२२३ धावा – जॉर्ज हेडली
२२२ धावा – नॅथन ऍस्टल
२२१ धावा – सुनील गावसकर
२१९ धावा – बिल एडरिक
२१४* धावा – गोर्डन ग्रिनिज
२१०* धावा – काईल मेयर्स
१९६ धावा – बाबर आझम
असा पराक्रम करणारा तिसराच पाकिस्तानी
कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा बाबर आझम तिसराच पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. यापूर्वी युनूस खान आणि सलीम मलिक या दोन फलंदाजांनी हा पराक्रम केला आहे. युनूस खानने पालेकेले येथे २०१५ साली श्रीलंकेविरुद्ध चौथ्या डावात नाबाद १७१ धावांची खेळी केली होती. तसेच सलीम मलिकने १९९७ साली श्रीलंकेविरुद्धच कोलंबो येथे चौथ्या डावात १५५ धावांची खेळी केली होती.
शफिकबरोबर विक्रमी भागीदारी
बाबर आझमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफिकबरोबर २२८ धावांची भागीदारी रचली. ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात पाकिस्तानकडून केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात केलेली एकूण दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर गोर्डन ग्रिनिज आणि डेसमंड हाईन्स यांची जोडी आहे. त्यांनी १९८४ साली वेस्ट इंडिजकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद २५० धावांची भागीदारी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्ध विकेट्सचा पंचक घेणाऱ्या बुमराहला मोठा फायदा, कसोटी क्रमवारीत टॉप-५ मध्ये; पाहा स्थान
Video: झेल घेतल्यावर क्षेत्ररक्षकासमोर विकेटकिपरने जोडले हात, असं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं नसेल
इथेही भारताकडून रोहितचाच डंका! कसोटी क्रमवारीत ‘या’ स्थानावर विराजीत, विराट तर जवळपासही नाही