वेस्ट इंडिजचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना मुल्तानच्या मुल्नात क्रिकेट स्टेडियमवर बुधवार (०८ जून) रोजी खेळला गेला. या सामन्यात यजमान पाकिस्तानने पाहुण्या वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानच्या (Pakistan vs West Indies) या विजयाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) शिल्पकार राहिला आहे. त्याने या सामन्यात खणखणीत शतक ठोकत (Babar Azam Century) इतिहास रचला आहे. याबरोबरच त्याने स्टार भारतीय फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याचा मोठा विक्रमही मोडित काढला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने सलामीवीर शाय होपच्या (Shai Hope) शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानला ३०६ धावांचे आव्हान दिले. होपने १३४ चेंडू खेळताना १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक १२७ धावा जोडल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून बाबर आझमने कर्णधार खेळी केली. १०७ चेंडू खेळताना ९ चौकारांच्या मदतीने त्याने १०३ धावा चोपल्या. या शानदार खेळीसह आझमने कर्णधार म्हणून त्याच्या वनडे क्रिकेटमधील १००० धावा (1000 ODI Runs As Captain)पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने फक्त १३ वनडे सामन्यांमध्ये या विलक्षण कामगिरीला गवसणी घातली आहे.
यासह आझम सर्वात कमी डावात अर्थात सर्वात जलद १००० वनडे धावा पूर्ण करणारा क्रिकेटविश्वातील कर्णधार बनला आहे. यापूर्वी माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावर या विक्रमाची नोंद होती. विराटने १७ डावांमध्ये कर्णधार म्हणून त्याच्या १००० वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र आता आझमने त्यालाही पछाडले आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर एबी डिविलियर्स (१८ डाव), चौथ्या क्रमांकावर केन विलियम्सन (२० डाव) आणि पाचव्या क्रमांकावर एलिस्टर कूक (२१ डाव) आहेत.
याखेरीज आझमने इतिहास रचत वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा शतकांची हॅट्रिक लगावली आहे. आझमचे हे वनडे क्रिकेटमधील सलग तिसरे शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका मागोमाग एक २ शतके ठोकली होती. तसेच यापूर्वी २०१६ मध्येही त्याने वनडे क्रिकेटमध्ये शतकांची हॅट्रिक केली होती. त्यावेळीही त्याच्यापुढे विरोधी संघ वेस्ट इंडिज होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा





