इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सध्या वनडे मालिका चालू आहे. इंग्लंडविरुद्ध सुरुवातीचे २ वनडे सामने गमावल्यानंतर पाहुणा पाकिस्तान संघ तिसऱ्या सामन्यात विजयाच्या इराद्याने उतरला असल्याचे दिसले. बर्मिंघम येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी मिळून यजमान इंग्लंडचा चांगलाच समाचार घेतला. त्यातही कर्णधार बाबर आझम याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत दीडशतकी खेळी केली. यासह त्याने मोठे विक्रम केले आहेत.
पहिल्या आणि दुसऱ्या वनडेत संघर्ष करताना दिसलेला आझम या सामन्यात वेगळ्याच रंगात दिसला. सलामीवीर फखर जमान बाद झाल्यानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. सुरुवातीला संथ फलंदाजी केल्यानंतर सलामीवीर इमाम-उल-हकसोबत शानदार भागिदारी करत त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर १०४ चेंडूंचा सामना करताना त्याने शतकाला गवसणी घातली. यासह सर्वात जलद १४ वनडे शतके करणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडविरुद्ध वनडे कारकिर्दीतील ८३ वा सामना आणि ८१ डाव खेळत असताना त्याने हे शतक झळकावले आहे. याबाबतीत त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकाचा क्विंटन डी कॉक, हाशिम अमला आणि ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज डेविड वॉर्नर यांनाही मागे टाकले आहे. त्याच्यानंतर ८४ डावात चौदावे वनडे शतक ठोकत अमला दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वॉर्नर (९८ वनडे डाव), कोहली (१०३ वनडे डाव) आणि डी कॉक (१०४ वनडे डाव) हेदेखील टॉप-५ मध्ये आहेत.
एवढेच नव्हे तर, तो पाकिस्तानकडून सर्वाधिक वनडे शतके झळकावणाऱ्या दिग्गजांच्या यादीतही तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता त्याच्यापुढे केवळ मोहम्मद युसुफ (२६७ डाव, १५ शतके) आणि सईद अनवर (२४४ डाव, २० शतके) यांचे आव्हान आहे.
लक्षवेधी बाब म्हणजे, केवळ शतकापर्यंत आझमची ही धुव्वादार खेळी मर्यादित राहिली नाही. त्याने पुढेही आपले आक्रमक प्रदर्शन कायम राखत १५० धावांपर्यंत मारली. अखेर ५०व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो डेविड मलानच्या हातून झेलबाद झाला आणि १३९ चेंडूत ४ षटकार व १४ चौकारांच्या मदतीने १५८ धावांची विक्रमी खेळी नोंदवून पव्हेलियनला परतला.
आझमव्यतिरिक्त सलामीवीर इमाम-उल-हक यानेही ५९ धावांचे योगदान दिले. तसेच मोहम्मद रिझवान यानेही ७४ धावा जोडल्या. यासह पाकिस्तानने ५० षटकांखेर ३३१ धावांचा भलामोठा आकडा फलकावर नोंदवला.
महत्त्वाच्या बातम्या-
ख्रिस गेलने बॅटवरून का हटवले ‘युनिव्हर्स बॉस’चे स्टिकर? ऐका त्याच्याच तोंडून
‘दादा’ची दादागिरी आता रुपेरी पडद्यावर! २५० कोटींच्या बजेटचा बायोपिक; पण अभिनेता कोण?
स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई, सामना जिंकणंही अवघड! ‘द हंड्रेड लीग’चे नवे नियम वाचलेत का?