लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने लखनौ संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाला 7 विकेट्स गमावल्यानंतर फक्त 171 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, पंजाबने 16.2 षटकांत 2 गडी गमावून 172 धावांचे लक्ष्य गाठले. अशाप्रकारे लखनौला हंगामातील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
खरंतर, लखनौ संघाचा गोलंदाज दिग्वेश सिंग राठीला मोठी शिक्षा झाली आहे. पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रियांश आर्य याला बाद केल्यानंतर केलेल्या लज्जास्पद कृत्याबद्दल दिग्वेशला ही शिक्षा मिळाली आहे. लखनौच्या गोलंदाजाने प्रियांशची विकेट नोटबुक स्टाईलमध्ये साजरी केली. यानंतर, गोलंदाजाला पंचांकडून इशाराही मिळाला आणि आता त्याला त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलनुसार, लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश सिंगला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. दिग्वेश सिंगने कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला आहे आणि सामनाधिकारी यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
लक्ष्याचा पाठलाग करताना 25 वर्षीय गोलंदाज दिग्वेश राठीने पंजाबला पहिला धक्का दिला हे उल्लेखनीय आहे. पंजाबच्या डावात तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने प्रियांश आर्यला बाद केले. विकेट घेतल्यानंतर तो प्रियांशच्या जवळ गेला आणि नोटबुक शैलीत आक्रमकपणे सेलिब्रेशन केले. मात्र, या घटनेनंतर लगेचच पंच राठीशी बोलताना दिसले. लखनौच्या गोलंदाजाला त्याच्या सेलिब्रेशनबद्दल पंचांनी इशारा दिल्यासारखे वाटत होते. आता आयपीएलने गोलंदाजावर मोठा दंड ठोठावला आहे.