पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं अपयशी होत आहे. खराब फॉर्ममुळे त्याला संघाचं कर्णधारपदही गमवावं लागलं. आता कर्णधारपदानंतर बाबरचं पाकिस्तान संघातील स्थानही धोक्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मुलतान कसोटीत बाबरनं पहिल्या डावात 30 आणि दुसऱ्या डावात फक्त 5 धावा केल्या होत्या.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या एका रिपोर्टनुसार, बाबर आझमला इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून ड्रॉप केलं जाऊ शकतं. रिपोर्टनुसार, नव्या निवड समितीनं बाबर आझमला ड्रॉप करण्याचा सल्ला दिला आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर काही तासांतच लाहोरमध्ये निवड समितीची एक बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी देखील शामील होते.
मुलतान कसोटीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद यानं बाबर आझमची पाठराखण केली होती. तो पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचं मसूदनं म्हटलं होतं. प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी देखील या व्यक्तव्याचं समर्थन केलं होतं. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, या बैठकीत संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक सहभागी झाले नव्हते.
बाबर आझमनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 55 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी त्यानं 100 डावांत फलंदाजी करताना 43.92 च्या सरासरीनं 3997 धावा केल्या. कसोटीत त्याच्या बॅटमधून 9 शतकं आणि 26 अर्धशतकं निघाली आहेत. जर बाबरला 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून ड्रॉप केलं जातं, तर तो 20 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कायदे आझम ट्रॉफीसाठी उपलब्ध राहू शकतो. मात्र त्यानं 2019 पासून एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. त्यामुळे तो स्पर्धेत खेळतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
ind vs nz; कसोटी मालिकेसाठी किंग कोहली बेंगळुरूला रवाना; बालेकिल्ल्यात 3 दिवसांनी सामना
मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं ट्रॉफी कोणाला दिली? टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
भारताचे वर्ल्ड कप विजेते प्रशिक्षक मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, संघानं दिली मोठी जबाबदारी