बाल उत्कर्ष मंडळाने आपल्या “सुवर्ण महोत्सवी वर्षा” निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी,शिवशक्ती,संघर्ष, शिव ओम्,यांची महिलांत, तर महिंद्रा, मुंबई बंदर, भारत पेट्रोलियम, महाराष्ट्र पोलीस यांची पुरुषांत आगेकूच सुरू.
लालबाग येथील गणेश गल्लीच्या मैदानावर सुरू असलेल्या महिलांच्या ब गटात महात्मा गांधीने अंकुरचा ३६-१६असा सहज पाडाव केला.विश्रांतीला २६-०८अशी मोठी आघाडी घेणाऱ्या महात्माने नंतर मात्र सावध खेळ करीत हा विजय साकारला.
पूजा किणी, तृप्ती सोनावणे,प्रतीक्षा मांडवकर, मिनल जाधव या विजयात चमकल्या. अंकुरची कांचन जुईकर एकाकी लढली. अ गटात शिवशक्तीने महात्मा फुलेला ४०-२१असे नमविले.
मृणाली भुवड, प्रतीक्षा तांडेल, साक्षी रहाटे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर शिवशक्तीने मध्यांतराला २१-०८अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. उत्तरार्धात महात्माच्या ममता जाधव, प्रगती कणसे यांनी बऱ्यापैकी लढत दिली.
क गटात संघर्षने अमरहिंदला ३०-२३असे पराभूत केले. मध्यांतराला दोन्ही संघ १३-१३असे बरोबरीत होते.कोमल देवकर,कोमल यादव, प्रणाली नागदेवते यांनी उत्तरार्धात आपला खेळ गतिमान करीत हा विजय साकारला.
तेजस्वीनी पोटे,दिव्या रेडकर यांचा खेळ अमरहिंदचा पराभव टाळण्यास कमी पडला. या दुसऱ्या पराभवामुळे अमरहिदचे आव्हान साखळीतच संपले. अन्य महिलांच्या सामन्यात शिव ओम्ने स्वराज्यचा १६-१३; संघर्षने एम एच चा ४०-२२; तर मुंबई पोलिसने अंकुरचा २५-०९असा पराभव केला.
पुरुषांच्या ड गटात महाराष्ट्र पोलीस ने मुं. पोलीस संघाला ३६-१२असे सहज नमविले. महेंद्र रजपूत, महेश मगदूम, विपुल मोकलं यांच्या झंजावाती खेळाने महा.पोलिसने विश्रांतरला २३-०५अशी भक्कम आघाडी घेतली होती.
मुंबईचा विशाल तळेकर बरा खेळला. याच गटात मुं. पोलीस वि युनियन बँक हा सामना २४-२४असा बरोबरीत सुटला. निलेश मोरे, सिद्धेश तटकरे यांनी आक्रमक खेळ करीत बँकेला मध्यांतरा पर्यंत १७-०५अशी आघाडी मिळवून दिली होती.
पण ती त्यांना राखणे जमले नाही. उत्तरार्धात किरण चव्हाण, चेतन गायकवाड, संकेत धुमाळ यांनी टॉप गिअर टाकत पोलिसांना बरोबरी साधून दिली.ब गटात मुंबई बंदरने रिझर्व्ह बँकेला ४१-१९असे धुऊन काढले.
शुभम कुंभार, ओमकार देशमुख,आदित्य शिंदे,गणेश हेरणे, यांनी या विजयात उत्कृष्ट खेळ केला. बँकेचा गणेश हटकर बरा खेळला. याच गटात महिंद्राने दिप्तेश चांदीवडे,सुहास वगरे यांच्या झंजावती खेळामुळे रिजर्व्ह बँकेचा ४८-२३असा पडावं केला.
भारत पेट्रोलियमने पश्र्चिम रेल्वेला ३३-१५असे रोखले. रेल्वेच्या या दुसऱ्या पराभवामुळे साखळीतच गारद होण्याची पाळी त्यांच्यावर आदी. अ गटात देना बँकेने सेन्ट्रल बँकेला १७-०८असे नमविले.