ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia and England)संघात सध्या ऍशेस २०२१-२२ (Ashes) मालिका सुरु असून या मालिकेतील चौथा कसोटी सामना सिडनी येथे झाला. सिडनी क्रिकेट मैदानात झालेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली आहे. ही घटना इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याबरोबर घडली.
झाले असे की, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघाकडून पहिल्या डावात बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) फलंदाजी करत होते. यावेळी ३१ व्या षटकात कॅमेरॉन ग्रीन गोलंदाजीसाठी आला. यावेळेला स्टोक्स स्ट्राईकवर होता. ग्रीनने या षटकातील टाकलेला पहिला चेंडू आत वळाला. त्यावर स्टोक्सने तो चेंडू सोडला. त्यामुळे चेंडू ऑफ स्टम्पला स्पर्श करत यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. पण, ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पायचीतसाठी अपील केले.
विशेष म्हणजे पंच पॉल रायफल यांनी देखील स्टोक्सला बाद दिले. मात्र, स्टोक्सने या विकेटसाठी रिव्ह्यूची मागणी केली. त्यामुळे या चेंडूचा व्हिडिओ पुन्हा पाहाण्यात आला. या व्हिडिओतून जे दिसले त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. कारण व्हिडिओमध्ये दिसले की ग्रीनने टाकलेल्या हा चेंडू जोरात स्टम्पला लागला होता, मात्र बेल्स खाली पडले नव्हते. त्यामुळे पंचांनी आपला निर्णय बदलला आणि स्टोक्सला जीवदान मिळाले. स्टोक्स त्यावेळी १६ धावांवर खेळत होता. पुढे स्टोक्सने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली.
गमतीचा भाग म्हणजे, ज्यावेळी व्हिडिओमध्ये दिसले की, चेंडू स्टम्पला लागूनही बेल्स पडल्या नाहीत, त्यावेळी स्टोक्सही आनंदाने चकीत झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेबद्दल शेन वॉर्न आणि ऍडम गिलख्रिस्टनेही आश्चर्य व्यक्त केले होते.
UNBELIEVABLE #Ashes pic.twitter.com/yBhF8xspg1
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2022
बेअरस्टोचे शतक
दरम्यान, सामन्यातील स्थितीतीबद्दल बोलायचे झाल्यास तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात ७० षटकात ७ बाद २५८ धावा केल्या आहेत. बेअरस्टो १०३ धावांवर आणि जॅक लीच ४ धावांवर नाबाद आहेत. मात्र, अजूनही इंग्लंड संघ १५८ धावांनी पिछाडीवर आहे. बेअरस्टोने तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील ७ वे शतक ठरले आहे.
तत्पूर्वी, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ४१६ धावांवर पहिला डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून या डावात उस्मान ख्वाजाने १३७ धावांची शतकी खेळी केली. तसेच स्टीव्ह स्मिथने ६७ धावा केल्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रिकेटमध्ये आयसीसीने लागू केला नवा नियम, गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक चूक पडणार महागात
Ashes: सिडनी कसोटीत बेअरस्टोचे शतक, पण इंग्लंड तिसऱ्या दिवसाखेर अद्याप १५८ धावांनी पिछाडीवर
व्हिडिओ पाहा – टोकियो ऑलिम्पिक… भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा