बांगलादेश क्रिकेट टीमनं रावळपिंडीत इतिहास रचला आहे. संघानं पाकिस्तानचा त्यांच्याच घरात पराभव केला. बांगलादेशनं पाकिस्तानविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 गडी राखून जिंकला.
पाकिस्तान संघानं पहिला डाव 448 धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात, बांगलादेशनं पहिल्या डावात 565 धावा केल्या. यानंतर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशनं दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता 30 धावा करत सामना सहज जिंकला.
पाकिस्ताननं पहिल्या डावात 6 विकेट गमावून 448 धावा केल्या होत्या. यानंतर संघानं डाव घोषित केला. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शतकी खेळी खेळली. रिझवाननं 239 चेंडूत नाबाद 171 धावा केल्या. त्यानं 11 चौकार आणि 3 षटकार हाणले. शकीलनं 141 धावांची खेळी केली. त्यानं 9 चौकार मारले. सॅम अयुबनं 56 धावांचे योगदान दिले. स्टार फलंदाज बाबर आझम काही विशेष करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला.
बांगलादेशनं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. संघानं पहिल्या डावात सर्वबाद 565 धावा केल्या. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमनं 191 धावांची मॅराथॉन खेळी खेळली. त्यानं 341 चेंडूंचा सामना करताना 22 चौकार आणि 1 षटकार लगावला. याआधी सदमान इस्लामनं 93 धावांची दमदार खेळी केली. इस्लामनं 12 चौकार मारले. लिटन दासनं अर्धशतक झळकावलं. त्यानं 78 चेंडूंचा सामना करत 56 धावा केल्या. त्यानं 8 चौकार आणि 1 षटकार मारला. मेहदी हसन मिराजनं 77 धावांची खेळी केली, तर मोमिनुल हकनं 50 धावांचं योगदान दिलं.
दुसऱ्या डावात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब झाली. मोहम्मद रिझवानशिवाय एकही फलंदाज चालला नाही. रिझवाननं 80 चेंडूत 51 धावा केल्या. त्यानं 6 चौकार मारले. सलामीवीर शफिकनं 37 धावा केल्या. त्यानं 3 चौकार मारले. सॅम अयुब 1 धावा करून बाद झाला. बाबर आझम 22 धावा करून बाद झाला. त्यानं 3 चौकार मारले. सौद शकील शून्यावर बाद झाला.
हेही वाचा –
शाकिब अल हसननं पुन्हा संयम गमावला, मैदानावरील या कृतीनं सगळेच हैराण
बाबर आझमला कसोटी संघातून डच्चू मिळणार? आकडेवारी फारच लाजिरवाणी
5 भारतीय खेळाडू ज्यांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला, एकाची तुलना चक्क धोनीशी व्हायची!