आगामी एप्रिल-मे महिन्यात इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. या हंगामासाठीचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडला. या लिलावात काही बांग्लादेशी खेळाडूंवर देखील मोठी बोली लागली. आणि काही आयपीएल संघांनी त्यांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
मात्र आयपीएलच्या आयोजनाच्या कालावधीतच बांग्लादेशचा राष्ट्रीय संघ काही आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. अशावेळी खेळाडूंसमोर आयपीएलमध्ये खेळायचे की देशासाठी खेळायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. मात्र बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना आयपीएलमध्ये भाग घ्यायचा असल्यास आम्ही कसलीही आडकाठी करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
शाकिबने यापूर्वीच घेतला आहे निर्णय
चेन्नई येथे पार पडलेल्या आयपीएल लिलावात बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. यांनतर शाकिबने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी फिट राहण्यासाठी शाकिबने हा निर्णय घेतला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने त्याच्या या निर्णयाला परवानगी देखील दिली आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केली भूमिका
याबाबत बोलताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अक्रम खान यांनी बोर्डाची भूमिका स्पष्ट केली. शाकिबला ज्याप्रमाणे आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे इतर खेळाडूंनी परवानगी मागितल्यास त्यानांही आम्ही आडकाठी करणार नाही, असे अक्रम यांनी यावेळी सांगितले. जर मुस्तफिझुर रेहमानने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले तर शाकिब प्रमाणे त्यालाही बोर्ड मंजुरी देईल, अशी भूमिका यावेळी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतली आहे.
अक्रम म्हणाले, “जो खेळाडू आमच्याकडे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागेल, त्याला आम्ही ते नक्कीच देऊ. कारण जर कोणी खेळाडू राष्ट्रीय संघासाठी खेळण्यास इच्छुक नसेल, तर त्याच्यावर दबाव टाकण्यात काहीच अर्थ नाही.”
बांग्लादेशचा संघ पुढील महिन्यात श्रीलंकेच्या संघाशी कसोटी मालिका खेळणार असून त्यांनतर तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यास जर खेळाडूंनी प्राधान्य दिले, तर ते या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
जड्डूच्या एका सल्ल्याने बदलले टेम्पो चालकाच्या मुलाचे आयुष्य, आता गाजवणार आयपीएलचं मैदान
इंजीनियरिंग केलेला अश्विन प्रत्येक सामन्यानंतर काय लिहितो? एकदा वाचून पाहा मग कळेलं
बुमराह आणि शमीला टी२० संघातून डच्चू देण्यामागचे कारण काय? घ्या जाणून