बांगलादेश क्रिकेट टीमचे हेड कोच चंदिका हतुरुसिंघे यांना शिस्त न पाळल्याबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. आधी त्यांना 48 तासांसाठी निलंबित करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर त्यांना कायमस्वरुपी निलंबित केलं गेलं. अशा परिस्थितीत आता फिल सिमन्स 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत बांगलादेश संघाचे काळजीवाहू मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील.
गेल्या काही काळापासून बांगलादेश क्रिकेट संघानं हतुरुसिंघे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्यांना निलंबित करण्याचं कारण शिस्तभंग हे आहे. हतुरुसिंघे हे 2023 एकदिवसीय विश्वचषकादरम्यान संघातील खेळाडू नसुम अहमदच्या कानशिलात लगावल्यामुळे वादात सापडले होते. याशिवाय ते मुख्य प्रशिक्षक असताता कोणाचीही परवानगी न घेता रजेवर गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
श्रीलंकेचे चंदिका हतुरुसिंघे यांना सर्वप्रथम 2014-2017 दरम्यान बांगलादेशचा हेड कोच बनवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी आपला कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता. हतुरुसिंघेच्या या वागणुकीनंतरही बांगलादेश क्रिकेट बोर्डानं त्यांच्यावर काही कारवाई केली नव्हती. यानंतर जानेवारी 2023 मध्ये त्यांना पुन्हा बांगलादेशचं हेड कोच बनवण्यात आलं. त्यांचा हा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्ये समाप्त होणार होता. मात्र त्यापूर्वीच शिस्तभंगामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
हतुरुसिंघे यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 ते 2017 दरम्यान बांगलादेश क्रिकेट संघाची कामगिरी फार चांगली राहिली होती. त्यावेळी संघानं भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यात यश मिळवलं होतं. मात्र त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात संघानं 2023 एकदिवसीय विश्वचषक आणि 2024 टी20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी केली. संघ दोन्ही विश्वचषकात साखळी फेरीतूनच बाद झाला होता.
हेही वाचा –
ऍशेस मालिकेची घोषणा; 43 वर्षात प्रथमच या ऐतिहासिक मैदानात सामना, पाहा संपूर्ण वेळापत्रक
SL vs WI: श्रीलंकेचा पलटवार, वेस्ट इंडिजचा दारुण पराभव, मालिकेत बरोबरी
भारत-न्यूझीलंड कसोटीपूर्वी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस, टाॅसला उशीर, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट