बांगलादेश सरकारने गुरूवारी (२२ जानेवारी) त्यांचा राष्ट्रीय संघ आगामी टी२० विश्वचषकावर बहिष्कार टाकत आहे, अशी घोषणा केली आहे. बांग्लादेशच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळायचे आहे, मात्र त्यांनी त्यांचे सामने श्रीलंकेत हलवावे अशी अट घातली होती. बांग्लादेश या स्पर्धेत खेळणार नाही हे त्यांच्या सरकारने ठरवले असले तरी अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) असणार आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) हे त्यांच्या भारतात न खेळण्याच्या भुमिकेवर ठाम उभे आहेत. फेब्रुवारीमध्ये भारत आणि श्रीलंकेत पुरूषांचा टी२० विश्वचषक २०२६ खेळला जाणार आहे. बांग्लादेश सरकारने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णयासाठी खेळ सलाहकार आसिफ नजरूल आणि विश्वचषकासाठी निवडलेले खेळाडू यांच्यात गुरूवारी (२२ जानेवारी) ढाकामध्ये चर्चासत्र घेतले होते. यामध्ये स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आयसीसी यावर अंतिम निर्णय घेईल, तत्पूर्वी ते या स्पर्धेतून माघार घेत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात राजकिय तणाव वाढत चालला आहे. याच कारणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलचा संघ कोलकाता नाईट रायडर्सला बांग्लादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानला करारमुक्त करण्यास सांगितले होते. त्यानंतरच बांग्लादेशने टी२० विश्वचषक खेळण्यास नकार दिला.
बांग्लादेश या स्पर्धेतील गट सी मध्ये होता. यामध्ये इंग्लंड, इटली, वेस्ट इंडिज आणि नेपाळ हे संघ आहेत. त्यांचे साखळी सामने कोलकाता आणि मुंबई येथे खेळवले जाणार होते. आता त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने त्यांच्याजागी स्कॉटलंड खेळण्याची शक्यता आहे.
आयसीसीनेही बांग्लादेश बोर्डसोबत या प्रकरणानंतर चर्चा केली होती. तेव्हा आयसीसीने त्यांच्या मागण्या नाकारल्या होत्या आणि भारतात त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत कोणतीही चिंता नाही, असा निर्वाळा दिला होता. तसेच बांग्लादेश या स्पर्धेत नाही खेळला तर ज्या संघाची टी२० क्रमवारी उत्तम तो संघ खेळेल, असे आयसीसीने स्पष्ट केले होते.
तसेच बांग्लादेश आयसीसीला पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले आहे.





