भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकासाठी अवघा तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याचा इरादा बांगलादेश संघाचा आहे. मात्र, तत्पूर्वी त्यांना एक मोठा धक्का बसला असून, वनडे संघाचा कर्णधार तमिम इक्बाल याने तडकाफडकी निवृत्ती घेतली. गुरुवारी (6 जुलै) पत्रकार परिषद घेत त्याने याबाबतची घोषणा केली.
सध्या बांगलादेश संघ अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामन्यात बांगलादेश संघाला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकबालयाने पत्रकार परिषदेत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला,
“काल अफगाणिस्तान विरुद्ध खेळलेला सामना माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. मी यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. अगदी तात्काळ घेतलेला निर्णय नाही. मी या गोष्टीचा अनेक दिवसांपासून विचार करत होतो. थांबण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी खेळलो. त्यांना अभिमान वाटावा असाच मी खेळण्याचा प्रयत्न केला. मला माहित नाही त्यांना कितपत मी गौरवान्वित करू शकलो. मात्र, मी माझे सर्व प्रयत्न केले.”
तमिम हा सध्या 34 वर्षांचा असून त्याने 2007 मध्ये बांगलादेशसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 2007 वनडे विश्वचषकात भारताला पराभूत करणाऱ्या बांगलादेश संघाच्या विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याने आपल्या कारकिर्दीत 70 कसोटी सामने खेळताना 5134 धावा, 241 वनडे सामने खेळताना 8313 व 78 टी20 सामने खेळताना 1758 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमधून मागील वर्षी निवृत्त झालेला तमिम सध्या वनडे संघाचे नेतृत्व भूषवत होता.
(Bangladesh ODI Captain Tamim Iqbal Announced Retirement From International Cricket With Immediate Effect)





