मुंबई । कॅरेबियन प्रिमियर लीग अर्थात सीपीएल 2020 ही 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध असलेली कॅरेबियन प्रिमियर लीग यंदा जैविक वातावरणात दर्शकांच्या विना रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहे.
या टी 20 लीग मधून दोन खेळाडूंनी आपली नावे माघारी घेतली असून त्यांनी सीपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश वनडे संघाचा कर्णधार तमीम इकबाल आणि टी 20 कर्णधार महमदुल्ला रियाद यांनी सीपीएलमध्ये खेळणार नाहीत. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
सीपीएल मधील जमैका तलावाज या संघांचे प्रतिनिधित्व केलेला अष्टपैलू खेळाडू महमदुल्लाने कोरोना व्हायरसमुळे या लीगमध्ये खेळणार नाही. 2017 साली तो या फ्रँचाईजीकडून खेळला आहे.
‘क्रिकइन्फो’शी बोलताना महमदुल्ला म्हणाला, “मी एका फ्रेंचायझीसोबत सोबत करार करणार होतो. माझा हा करार अंतिम टप्प्यापर्यंत आला होता. पण कोरोना महामारीत प्रवास करणे अवघड आहे. मी यापूर्वीही सीपीएलमध्ये खेळलो असून या लीगमध्ये खूप आनंद घेतला आहे.”
सेंट लुसिया संघाचे प्रतिनिधित्व करणारा तमीम इकबाल याने ढाका प्रिमियर लीग खेळण्यासाठी सीपीएलमधून नाव माघारी घेतले आहे. तो म्हणाला, “कॅरेबियन प्रीमियर लीगमधील एका संघाने माझ्याशी संपर्क केला होता. मात्र ढाका प्रिमियर लीग कधीही सुरू होऊ शकते. मला या ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळायचे असल्याने मी सीपीएलची ऑफर नाकारली.”
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच भारतीय खेळाडू खेळताना दिसून येणार आहे. आयपीएल 2020 साली केकेआरच्या संघाने खरेदी केलेला प्रवीण तांबे यंदा सीपीएलमधून त्रिनिदाद अँड टोबॅगो नाइट रायडर संघाकडून खेळणार आहे.
प्रवीण तांबेने सीपीएलमध्ये खेळणार असल्याने बीसीसीआयने त्याला आयपीएलमध्ये खेळण्यास प्रतिबंध घातला आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, एखाद्या खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला विदेशी लीगमध्ये खेळता येते.