फेब्रुवारी महिन्यात क्रिकेटविश्वात आणखी एक मोठी स्पर्धा सुरू होत आहे. पुरूषांचा टी२० विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद गतविजेता भारत आणि श्रीलंकेला मिळाले आहे. ही स्पर्धा सुरू होण्याला काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना बांग्लादेश क्रिकेटमध्ये मात्र वेगळेच वातावरण आहे. एकीकडे इतर संघ तयारीला लागले असून बांग्लादेश या स्पर्धेत खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“बांग्लादेशाच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळायचे आहे मात्र आमच्या हातात काही नाही”, असे विधान बांग्लादेशचा फलंदाज नजमुल होसेन शंटो याने केले आहे.
शंटोचे हे वक्तव्य बांग्लादेश क्रिकेट बोर्डच्या (बीसीबी) अंतिम भुमिकेआधी आले. त्याने मीडियाशी बोलताना म्हटले, “क्रिकेट वेलफेयर असोसिएशन ऑफ बांग्लादेश (सीडब्लूएबी) यांच्याशी कोणतेही अधिकृत बोलणे झाले नाही. खेळाडू मात्र बोर्डच्या भुमिकेमुळे चिंतेत आहेत. जे सीडब्लूएबीशी जोडले गेले आहेत ते सध्या सामने खेळण्यात व्यस्त आहेत. सध्या जे काही सुरू आहे, त्यामुळे खेळाडूंच्या मनस्थितीवर वाईट परिणाम होत आहे.”
“आयसीसी स्पर्धामध्ये खेळायला कोणाला आवडणार नाही. अशा स्पर्धा काही सारख्याच होत नाही. या स्पर्धांमध्ये खेळणे हे क्रिकेटपटू म्हणून उत्तम. वनडे विश्वचषक तर चार वर्षांनी येतो,” असेही शंटोने मीडीयाशी बोलताना म्हटले आहे.
बोर्डाची स्पष्ट भुमिका काय आहे याबाबत शंटोने माहित नसल्याचे सांगितले आहे. “आतमध्ये काय घडत आहे हे नीट माहित नाही, मात्र आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे”, असे त्याने पुढे म्हटले. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार खेळाडूंचा नसून बीसीबीचा आहे हे पण त्याने स्पष्ट केले आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात राजकिय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या कोलकाता क्रिकेट नाईट रायडर्स संघाला मुस्तफिजूर रहमान याला करारमुक्त करण्यास सांगितले होते. या प्रकरणानंतर भारतात बांग्लादेशविरुद्ध रोष वाढत चालला आहे आणि त्यामुळेच खेळाडू तेथे सुरक्षित नाही असे मत बांग्लादेशने मांडले होते.
शंटो प्रमाणेच बांग्लादेशचा कर्णधार लिटन दासनेही बोर्ड आणि खेळाडू यांच्यात काही बोलणे झाले नाही हे सांगितले आहे. काही निर्णय घेण्याअगोदर बोर्ड खेळाडूंना विचारणार की नाही हे पण मला माहित नाही, असेही मत त्याने व्यक्त केले आहे.
तसेच त्यांनी भारतात जे बांग्लादेशचे सामने होणार आहेत, ते श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. टी२० विश्वचषकामध्ये बांग्लादेशाचे सामने भारतात कोलकाता आणि मुंबई येथे खेळवण्याचे नियोजन आहे.





