भारतीय संघाचा बंदी घातलेला वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने त्याच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने घातलेल्या आजीवन बंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे.
२०१३च्या आयपीएल दरम्यान श्रीसंतला दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केली होती. यानंतर श्रीसंत एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. या प्रकरणामुळे बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली आहे.
श्रीसंत सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या निर्णयाबद्दल म्हणाला “माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. क्रिकेट हा अपवाद सोडला तर माझे आयुष्य छान चालू आहे. मी माझ्या हक्कासाठी लढत आहे. हे फक्त देशाकडून खेळण्यासाठीच नाही तर गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठीही आहे.”
श्रीसंतचे म्हणणे आहे की तो गेले साडेचार वर्ष शांत होता. त्यामुळे सध्या त्याला वाटतंय की आता बोलायची वेळ आली आहे. याबद्दल तो म्हणाला “म्हणूनच मी बोलायला लागलो आणि ही फक्त सुरुवात आहे. खूप गोष्टी चांगल्या व्हायला लागल्या आहेत.”
श्रीसंतने स्पष्ट केले आहे की त्याने बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा केंद्रविरोधी त्याची तक्रार नाही. या बद्दल तो म्हणाला ” मला फक्त एव्हढच म्हणायचे आहे की माझ्याबरोबर १३ जण आरोपी होते आणि त्यांना वेगळ्या प्रकारे वागवले जाते. माझी याबद्दल तक्रार आहे. माझे असे म्हणणे नाही की त्यांची नावे उघड करावी. मला याबद्दल खूप चांगले माहित आहे. कारण मी या सगळ्या वाईट परिस्थितीतून गेलो आहे. “
पुढे तो म्हणाला “हे ह्याने केले, याने नाही केले हे सांगणे खूप सोपे आहे. पण नंतर कोणीतरी पुरावा घेऊन येतो आणि ते जगाला दाखवले जाते. बीसीसीआय काहीना काही कंमेंट करत असते पण अखेर लोक मूर्ख नाही.”