शनिवारी(१९ डिसेंबर) स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगामध्ये बार्सिलोना विरुद्ध वेलेंसिया संघात सामना झाला या सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. याच सामन्यादरम्यान बार्सिलोनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने १ गोल केला. याबरोबरच त्याने महान फुटबॉलपटू पेलेंच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
शनिवारी १ गोल केल्याने आता मेस्सीचे बार्सिलोनाकडून ६४३ गोल झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही एकाच क्लबकडून सर्वाधिक गोल करण्याच्या पेले यांच्या विक्रमाची मेस्सीने बरोबरी केली आहे. मेस्सीला १७ मोसमात यासाठी ७४८ सामने खेळावे लागले. मेस्सी वयाच्या १७ व्या वर्षापासून (२००४ पासून) बार्सिलोनाकडून खेळत आहे. त्याने २००५ मध्ये बार्सिलोनाकडून पहिला गोल केला होता.
पेले यांनी सांतोस क्लबकडून ६४३ गोल केले आहेत. ते वयाच्या १५ व्या वर्षापासून म्हणजेच १९५६ पासून ते १९७४ पर्यंत सांतोसकडून खेळले. यावेळी त्यांनी एकूण १९ हंगामात ६६५ सामने खेळताना ६४३ गोल केले होते.
https://twitter.com/FCBarcelona/status/1340328412007833600
मेस्सीचा विक्रमी गोल –
शनिवारच्या सामन्यात मेस्सीने पूर्वार्धाच्या इंज्यूरी टाईममध्ये गोल करत बार्सिलोनाकडून ६४३ वा गोल केला. याबरोबरच त्याने सामन्यात संघाला बरोबरी साधून दिली. वेलेंसियाकडून पहिला गोल मोकटार डियाखाबीने २९ व्या मिनिटाला केला होता. त्यानंतर रोनाल्ड आरुजोने ५३ व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, मेस्सी गोमेजने ६९ व्या मिनिटाला वेलेंसियाकडून गोल करत संघाला बरोबरी साधून दिली.
सध्या ला लीगामध्ये बार्सिलोना संघ संघर्ष करताना दिसत आहे. बार्सिलोना संघ ५ व्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऍटलेटिको मद्रिदपेक्षा ८ गुणांनी पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०: स्वयंगोल होऊनही ब्लास्टर्सने ईस्ट बंगालला रोखले






