रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि भारताचा विजय निश्चित केला. या षटकारामुळे मात्र बांग्लादेशचे निदहास ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.
हा सामना कार्तिकसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात तुफानी फटकेबाजी करताना 8 चेंडूतच नाबाद 29 धावांचा (6, 4, 6, 0, 2, 4, 1, 6) पाऊस पाडला. त्याच्या या महत्वपूर्ण खेळीसाठी त्याला सामानावीराचा पुरस्कारही देण्यात आला. या पुरस्कारामुळे कार्तिकने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
त्याने आंतराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वात कमी चेंडू खेळून (गोलंदाजीचा समावेश नाही) सामनावीर पुरस्कार मिळवण्याच्या ब्रैड हॉज यांच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रैड हॉजने 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध 8 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यांनाही सामनावीर पुरस्कार मिळाला होता.
निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने ४ विकेट्सने बांग्लादेशला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार रोहीतनेही अर्धशतक केले आहे. तसेच चहलने १८ धावा देत ३ विकेट्स घेऊन महत्वपूर्ण कामगिरी केली होती.
आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वात कमी चेंडू खेळून(गोलंदाजीचा समावेश नाही) सामनावीराचा मान पटकावणारे खेळाडू:
8 चेंडू – दिनेश कार्तिक, भारत (29*धावा) विरुद्ध बांग्लादेश, कोलंबो- 2018
8 चेंडू – ब्रैड हॉज, ऑस्ट्रेलिया (21* धावा) विरुद्ध दक्षिण आफ्रिका , डर्बन- 2014, (हा सामना 7-7 षटकांचा होता)
9 चेंडू – रामनरेश सरवन, वेस्टइंडीज (19*धावा) विरुद्ध इंग्लंड, ओवल- 2009, (हा सामना 9-9 षटकांचा होता )
10 चेंडू – जॉस बटलर, इंग्लैंड (32 धावा) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बर्मिंघम- 2012, (हा सामना 11-11 षटकांचा होता)