MPL 2025: अल्पावधीतच राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीगमध्ये मानाचे स्थान पटकावलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) स्पर्धेचा तिसरा हंगाम 4 जूनपासून खेळला जाईल. या स्पर्धेत चौकार-षटकारांची आतिशबाजी होत असते. एमपीएलच्या पहिल्या हंगामात अशीच आतिषबाजी पाहायला मिळाली होती. या पहिल्या हंगामात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या तीन खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया. (Most sixes in mpl 2023)
भारताच्या अंडर 19 संघाचा त्यावेळी सदस्य असलेला अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) हा एमपीएलच्या पहिल्या हंगामाचा खऱ्या अर्थाने शोध ठरला होता. स्पर्धेत फक्त तीन सामने खेळताना त्याने आपल्या फलंदाजी व गोलंदाजीने ओळख निर्माण केली. एका सामन्यात शतक तर एका सामन्यात 93 धावांची खेळी करताना त्याने आपल्यातील आक्रमक फलंदाजाची झलक दाखवलेली. अर्शिनने या तीन सामन्यांमध्ये तब्बल 19 षटकार मारत, सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावले होते.
ईगल नाशिक टायटन्स संघासाठी खेळणारा यष्टीरक्षक धनराज शिंदे (Dhanraj Shinde) हा फिनिशर म्हणून आपली ओळख बनवण्यात यशस्वी ठरलेला. नाशिक संघासाठी सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने प्रत्येक सामन्यात आपल्या बॅटने आक्रमक फटके खेळले. त्याने स्पर्धेत 192 पेक्षा जास्तीच्या स्ट्राइक रेटने 162 धावा करताना 13 षटकार लगावले होते.
एमपीएल 2023 मध्ये विजेता ठरलेल्या रत्नागिरी जेट्स संघाच्या विजयात प्रितम पाटील (Preetam Patil) याचे विशेष योगदान होते. निखिल नाईक याच्यासोबत त्याने संघासाठी फिनिशरची जबाबदारी सांभाळली. त्याने आपल्या संघासाठी सहा सामने खेळताना 140 धावा केलेल्या. यामध्ये 13 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करत आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) एमसीए अध्यक्ष झाल्यानंतर, त्यांनी हा प्रयोग सुरू केला होता. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 4 जून ते 24 जून या काळात ही स्पर्धा होईल. JioHotstar ओटीपी प्लॅटफॉर्मवर हे सामने लाईव्ह स्ट्रीमिंग केले जातील. तसेच, Star Sports 2 टीव्ही चॅनेलवर घरबसल्या क्रिकेट चाहत्यांना हे थरारक सामने पाहता येतील. मागील दोन वर्षाप्रमाणे यंदाही चाहत्यांना कोणत्याही तिकिटाविना थेट स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहता येतील. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)






