---Advertisement---

MPL 2025: एमपीएल 2024 मध्ये हा ठरलेला ‘षटकारांचा बादशाह’, 32 षटकारांची लावलेली रास

On: मंगळवार, मे 27, 2025 6:42 PM
---Advertisement---

MPL 2025: अल्पावधीतच राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीगमध्ये मानाचे स्थान पटकावलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) स्पर्धेचा तिसरा हंगाम 4 जूनपासून खेळला जाईल. या स्पर्धेत चौकार-षटकारांची आतिशबाजी होत असते. एमपीएलच्या दुसऱ्या हंगामात अशीच आतिषबाजी पाहायला मिळाली होती. या हंगामात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या तीन खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया. (Most sixes in mpl 2024)

ईगल नाशिक टायटन्स संघाने एमपीएल 2024 मध्ये अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला होता. त्यांच्या या यशात आक्रमक फलंदाज अथर्व काळे (Atharva Kale) याने बहुमूल्य योगदान दिले.‌ सुरुवातीला लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर, नाशिकने त्याच्यावर बोली लावली होती. हा विश्वास सार्थ ठरवताना त्याने 13 सामन्यात 378 धावा ठोकल्या. यामध्ये तब्बल 32 षटकारांचा समावेश होता. संपूर्ण हंगामात त्याने 165 पेक्षा जास्त च्या स्ट्राइक रेटने धावा बनवलेल्या.

ईगल नाशिक टायटन्स संघासाठी खेळणारा यष्टीरक्षक धनराज शिंदे (Dhanraj Shinde) हा पहिल्याच हंगामात फिनिशर म्हणून आपली ओळख बनवण्यात यशस्वी ठरलेला. नाशिक संघासाठी सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने दुसऱ्या हंगामातही आपल्या बॅटने आक्रमक फटके खेळले. त्याने या हंगामात 280 धावा करताना 27 गगनचुंबी षटकार लगावले होते. धनराजने एका षटकाचे सलग पाच षटकार मारण्याची कामगिरी देखील केलेली.

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याच्यासाठी एमपीएल 2024 चांगलीच लाभदायी ठरली होती. कर्णधार व फलंदाज या दोन्ही आघाड्यावर तो यशस्वी ठरलेला. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर (383 धावा) राहिलेल्या त्रिपाठीने सर्वाधिक 210 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजी फोडलेली. त्याने केवळ दहा सामने खेळत 22 उत्तुंग षटकार खेचलेले.

पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड व ईगल नाशिक टायटन्सचा मंदार भंडारे हे देखील प्रत्येकी 20 षटकार मारण्यात यशस्वी झाले होते. एमपीएल 2023 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या अर्शिन कुलकर्णी, रत्नागिरी जेट्सच्या प्रीतम पाटील व धीरज फटांगरे यांनी प्रत्येकी 16 षटकार मारत चाहत्यांचे मनोरंजन केले होते.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करत आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) एमसीए अध्यक्ष झाल्यानंतर, त्यांनी हा प्रयोग सुरू केला होता. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 4 जून ते 22 जून या काळात ही स्पर्धा होईल. JioHotstar ओटीपी प्लॅटफॉर्मवर हे सामने लाईव्ह स्ट्रीमिंग केले जातील. तसेच, Star Sports 2 टीव्ही चॅनेलवर घरबसल्या क्रिकेट चाहत्यांना हे थरारक सामने पाहता येतील. मागील दोन वर्षाप्रमाणे यंदाही चाहत्यांना कोणत्याही तिकिटाविना थेट स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहता येतील. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---