---Advertisement---

MPL 2025: एमपीएल 2024 मध्ये सर्वाधिक अर्धशतके मारणारे फलंदाज, विरोधी गोलंदाजांचा घेतला समाचार

On: मंगळवार, मे 27, 2025 3:56 PM
---Advertisement---

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) सुरू होण्यासाठी आठ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित करत असलेल्या या स्पर्धेचा हा तिसरा हंगाम असेल. स्पर्धेचे पहिले दोन हंगाम तुफान यशस्वी झाले होते. त्यापैकी दुसऱ्या हंगामात सर्वाधिक अर्धशतके ठोकणाऱ्या फलंदाजांची यादी आपण पाहूया. (batters who scored most fifties in mpl 2024)

एमपीएलच्या पहिल्या हंगामाप्रमाणेच दुसरा हंगाम देखील पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाच्या अनुभवी फलंदाज अंकित बावणे (Ankeet Bawne) यानेच गाजवला. त्याने या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक धावा बनवत ऑरेंज कॅप जिंकली होती. यासोबतच, त्याने स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके ठोकलेली. संपूर्ण हंगामात 12 सामने खेळताना 51 च्या दमदार सरासरीने 415 धावा केल्या होत्या. यामध्ये चार अर्धशतके सामील होती. या हंगामात त्याची सर्वोच्च धावसंख्या 94 होती.

छत्रपती संभाजी किंग्स संघ स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. मात्र, त्यांचा युवा सलामीवीर ओम भोसले (Om Bhosale) याने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. त्याने 11 सामने खेळताना 380 धावा कमावल्या होत्या. यामध्ये तीन अर्धशतके त्याच्या बॅटमधून आलेली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला.

पहिल्या हंगामात आपल्या अष्टपैलू कामगिरीने कौतुक वसूल करून घेणारा अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) दुसऱ्या हंगामात देखील चमकला. ईगल नाशिक टायटन्स संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. स्पर्धेत 13 सामने खेळून 314 धावा करणाऱ्या अर्शिनने तीन अर्धशतकांसह आपला हंगाम सजवला होता. यामध्ये त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी 97 धावांची राहिलेली.

याव्यतिरिक्त आणखी तीन फलंदाजांनी स्पर्धेत तीन अर्धशतके ठोकली होती. यामध्ये पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचा कर्णधार राहुल त्रिपाठी, रायगड रॉयल्सचा सिद्धेश वीर व ईगल नाशिक टायटन्सचा अथर्व काळे हे सामील आहेत. तर, पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, छत्रपती संभाजी किंग्सचा दिग्विजय पाटील व ईगल नाशिक टायटन्सचा रणजीत निकम हे देखील प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरले होते.‌ याव्यतिरिक्त 11 विविध फलंदाजांनी किमान एक अर्धशतक आपल्या नावावर जमा केलेले.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत या स्पर्धेचे आयोजन होत आहे. मावळ तालुक्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम 4 जून ते 22 जून या काळात ही देखणी स्पर्धा पार पडेल. यावर्षी प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील खेळली जाईल. देशात प्रथमच कोणतीही राज्य क्रिकेट संघटना महिलांसाठी, टी20 लीग आयोजित करत आहे. या दोन्ही स्पर्धांचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar या ओटीपी प्लॅटफॉर्मवर होईल. तर, Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर घरबसल्या सामने पाहता येणार आहेत. एमसीएने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनाशुल्क प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---