आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान राॅयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थान संघाचा हैदराबादनं दारुण पराभव केला. यासह आयपीएल 2024 मधील राजस्थानचा प्रवास यथेच थांबला.
सामना संपल्यानंतर राजस्थानचा विस्फोटक फलंदाज शिमराॅन हेटमायरवर बीसीसीआयनं आयपीएलच्या आचार सहिंतेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. बीसीसीआयनं शिमराॅन हेटमायरला सामना फी च्या 10 टक्के दंड ठोठावला आहे. हेटमायरनं देखील आयपीएलच्या आचार सहिंतेचा भंग केल्याचं मान्य केलं आहे. मात्र त्याला दंड का ठोठावण्यात आला, हे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
हैदराबादविरुद्ध सामन्यामध्ये हेटमायर फ्लाॅप ठरला. त्यानं 4 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. तो पार्टटाइम गोलंदाज अभिषेक शर्माच्या गोलंदाजीत बाद झाला. आयपीएल 2024 मध्ये हेटमायरनं खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यानं 12 सामन्यात केवळ 113 धावा काढल्या आहेत, ज्यामध्ये एकाही अर्धशतकाचा समावेश नाही.
हेटमायरच्या आधी आयपीएल दरम्यान अनेक खेळाडूंवर बीसीसीआयनं कडक कारवाई केली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या तसेच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत यांच्यावरही आयपीएलच्या आचार सहिंतेचा भंग केल्याप्रकरणी बीसीसीआयनं कारवाई केली आहे. रिषभ पंतवर यावर्षी एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. तर हार्दिक पांड्यावर आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यासाठी बंदी आहे. यासह बीसीसीआयनं अनेक खेळाडूंवर आयपीएल नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे.
आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सनं उत्तम कामगिरी केली आहे. मात्र संघाला फायनलमध्ये स्थान मिळवता आलं नाही. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं 14 साखळी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 8 सामने जिंकले आणि 5 गमावले. गुणतालिकेत राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. एलिमिनेटरमध्ये त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. त्यांनी आरसीबीचा पराभव करून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला होता. मात्र हैदराबाद समोर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थानच्या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसनची प्रतिक्रिया म्हणाला, “आमच्या गोलंदाजांवर…”
पॅट कमिन्सच्या संघाची आणखी एका फायनलमध्ये धडक, हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय