मुंबई । कोरोना व्हायरसच्या नंतर भारतीय संघ क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा दिसून येईल. संघातील खेळाडूही मैदानावर कमबॅक करण्यास उत्सुक आहेत. तर दुसरीकडे बीसीसीआय कोरोना नंतरच्या क्रिकेटच्या मालिकांचे नियोजन करण्यात व्यस्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱयावर जाणार आहे. दोन्ही संघात वनडे अथवा टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होण्याची शक्यता आहे. सोमवारी बीसीसीआयने श्रीलंकेच्या क्रिकेट दौऱ्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. पण या दौऱ्यासाठी भारत सरकारची परवानगी आवश्यक आहे. भारत सरकारच्या परवानगीनंतरच हा दौरा होऊ शकतो.
नियोजनानुसार भारतीय संघाचा जून मध्ये श्रीलंका दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात भारतीय संघातील ३ टीट्वेंटी सामने आणि त्याचबरोबर ३ वनडे सामने खेळणार होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता क्रिकेटच्या सर्वच मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या.
याचसोबत श्रीलंका देश आशिया चषक टीट्वेंटी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेसाठी मंजुरी दिली आहे. वास्तविक पाहता ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार नसल्याने शेवटी या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला मिळाले. श्रीलंकेला यजमानपद देण्यास पाकिस्तान देखील होकार दिला असलेचे श्रीलंका बोर्डाने दावा केला आहे.