जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धां टोकियो येथे सुरू आहेत. शनिवारी (७ ऑगस्ट) भारतीय पथकाने अखेरच्या दिवशी आपले आव्हान सादर केले. या अखेरच्या दिवशी भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक तर, कुस्तीपटू बजरंग पूनिया याने कांस्य पदक मिळवत भारताच्या पदकांची संख्या ७ पर्यंत नेली. संपूर्ण देशभरातून खेळाडूंवर कौतुकाचा बक्षिसांचा वर्षाव होत असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्व विजेत्या खेळाडूंना पुरस्कार जाहीर केले आहेत.
बीसीसीआय देणार रोख रकमेचे पुरस्कार
टोकियो ऑलिम्पिकचा समारोप समारंभ ८ ऑगस्ट रोजी पार पडेल. तत्पूर्वी, ७ ऑगस्ट रोजी भारताच्या सर्व खेळाडूंनी आपापल्या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी करून ७ पदके मिळवून दिली. या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारांनी त्यांना रोख रकमेचे पुरस्कार देखील घोषित केले.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीसीसीआयने देखील या विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा केली. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. बीसीसीआय सुवर्णपदक जिंकणार्या खेळाडूंना १ कोटी, रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ५० लाख व वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना २५ लाख रुपये देणार आहे. तर, पुरुष हॉकी संघाला १ कोटी २५ लाख रुपये दिले जातील.
INR 1 Cr. – 🥇 medallist @Neeraj_chopra1
50 lakh each – 🥈 medallists @mirabai_chanu & Ravi Kumar Dahiya
25 lakh each – 🥉 medallists @Pvsindhu1, @LovlinaBorgohai, @BajrangPunia
INR 1.25 Cr. – @TheHockeyIndia men's team @SGanguly99| @ThakurArunS| @ShuklaRajiv
— Jay Shah (@JayShah) August 7, 2021
या भारतीय खेळाडूंनी जिंकली पदके
टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरली. भारताने सर्वाधिक सात पदके मिळवली. भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण, वेटलिफ्टर मिराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार यांनी रौप्य पदके आपल्या नावे केली. महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, कुस्तीपटू बजरंग पूनिया, महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन आणि पुरूष हॉकी संघाने कांस्य पदके मिळवली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीयांसाठी भावूक क्षण! १३ वर्षानंतर वाजले ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत, पाहा व्हिडिओ
उर्वरित आयपीएल २०२१ ची तयारी सुरू; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सदस्यांनाच जाता येणार युएईला
भारतीय गोल्फर अदितीच्या पदरी अपयश; म्हणाली, ‘चौथ्या स्थानावर समाधान मानू तरी कसे’