भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (८ सप्टेंबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी १५ सदस्ययी संघाची घोषणा केली आहे. याबरोबरच या स्पर्धेसाठी ३ राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. येत्या १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषकाला संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान या देशांमध्ये सुरुवात होणार आहे.
भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद रोहित शर्माकडे कायम आहे. तसेच भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार या अनुभवी खेळाडूंना स्थान मिळाले असून सूर्यकुमार यादव, इशान किशन, राहुल चाहर यांनीही संघात स्थान मिळवले आहे.
याशिवाय आर अश्विनचे ४ वर्षांनी टी२० संघात पुनरागमन झाले आहे. तर शिखर धवन, युजवेंद्र चहलला मात्र संघातून वगळले आहे. याबरोबरच श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दिपक चाहर हे राखीव खेळाडू असतील.
असा आहे टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर
टी२० विश्वचषकाबद्दल थोडक्यात
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. हे टी२० विश्वचषकाचे ७ वे पर्व आहे. हा विश्वचषक भारतात पार पडणार होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे ही स्पर्धा युएई आणि ओमानला हलवण्यात आली. असे असले तरी स्पर्धेचे यजमानपद भारताकडेच असणार आहे.
या विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून पहिल्या फेरीपासून होईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेला म्हणजेच सुपर १२ फेरीला सुरुवात होईल. या स्पर्धेचा पहिला सामना ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. तसेच सुपर १२ फेरीतील पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने होईल. यानंतर २४ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ दुबई येथे आमने-सामने येतील.
बाद फेरीचे सामने १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडतील. १० आणि ११ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होतील, तर १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल.
या विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. टी२० क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी होईल. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.
सुपर १२ च्या फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी एकमेकांसमोर येतील.
या स्पर्धेचे सर्व सामने दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबुधाबीमधील शेख झायद स्टेडियम, शारजाहमधील शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे पार पडणार आहे.
हे संघ होणार सहभागी
आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीसाठी गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिल्या गटात समावेश आहे. या गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. तसेच सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच या गटातही पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील.
तसेच सुपर १२ फेरीआधी पार पडणाऱ्या पहिल्या फेरीत ८ संघ खेळतील. ८ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या देशांचा समावेश आहे. त्यांचीही २ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात श्रीलंका, आयर्लंड, नामीबिया आणि नेदरलंड्स यांचा समावेश आहे. तर ब गटात ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे.
भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक-
सुपर १२ फेरी –
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी ( संध्या- ७.३० वाजता)
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
बाद फेरी –
१० नोव्हेंबर – उपांत्य सामना – १, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
११ नोव्हेंबर – उपांत्य सामना – २, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
१४ नोव्हेंबर – अंतिम सामना, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
महत्त्वाच्या बातम्या –
दे घुमा के! हार्दिक परतला जुन्या रंगात, सराव सत्रात ठोकला खणखणीत ‘हेलिकॉप्टर शॉट’
कसोटी क्रमवारी: रोहित-विराट यांच्यातील गुणांचा फरक वाढला; शार्दुल, बुमराहला फायदा
ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतरही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ २ बदलांंची आवश्यकता