भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज माजी क्रिकेटपटू सबा करीम यांची व्यवस्थापक पदी नियुक्ती केली आहे.
हे पद सप्टेंबर २०१७ पासून रिक्त होते. याआधी कै. एम व्ही श्रीधर बीसीसीआयच्या व्यवस्थापकपदी होते; पण त्यांनी यावर्षी सप्टेंबर महिन्यात या पदाचा राजीनामा दिला होता. बीसीसीआय तेव्हापासून क्रिकेट तज्ञ् किंवा मोठ्या स्थरावर खेळलेला खेळाडू नवीन व्यवस्थापक म्हणून शोधत होते.
बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे करीम यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या असणार आहेत. या जबाबदाऱ्यांमध्ये क्रिकेटला धोरणात्मक दिशा देणे, कार्यरत योजनांची अंबलबजावणी करणे, बजेटिंग, सामन्यांच्या नियमांचे निरीक्षण आणि अंबलबजावणी करणे, क्रिकेटठिकाणांना सांभाळणे, देशांतर्गत क्रिकेटच्या कार्यक्रमांचे प्रशासन सांभाळणे इ. यांचा समावेश आहे.
या पदावर करीम १ जानेवारी २०१८ पासून रुजू होतील. त्यांना बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांना रिपोर्ट करावा लागेल. तसेच ते जोहरी यांना मंडळाच्या दृष्टी आणि धोरण विषयक बैठकीमध्ये साहाय्य करतील.
करीम हे चांगले क्रिकेट तज्ज्ञ आहेत. त्यांनी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारताकडून एक कसोटी आणि ३४ वनडे सामने खेळले आहेत. तसेच लिस्ट ‘ए’चे १२४ सामने खेळले आहेत.
प्रथम श्रेणीत बिहार आणि नंतर बंगाल संघाकडून खेळताना करीम यांनी ५६.६६ च्या सरासरीने २२ शतके आणि ३३ अर्धशतकांसह ७००० धावा केल्या आहेत.
त्यांची क्रिकेटमध्ये कारकीर्द घडत असताना त्यांना बांग्लादेशमध्ये आशिया कपच्या दरम्यान डोळ्यांची दुखापत झाली, त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली.
करीम यांनी बीसीसीआयच्या निवड समितीतही काम केले आहे.