भारताचे माजी गोलंदाज रमेश पवार यांच्याकडे भारतीय महिला संघाचे प्रभारी प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी काही दिवसांपूर्वी महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
त्यामुळे 25 जुलैपासून बेंगळूरुमध्ये सुरु होणाऱ्या भारतीय महिला संघाचा कॅम्प रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल.
आरोठे यांनी संघातील काही वरिष्ठ खेळाडूंबरोबर मतभेद झाल्याने हे प्रशिक्षकपद सोडले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2017मध्ये झालेल्या विश्वचषकात उपविजेतेपद मिळवले होते.
आरोठे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यामुळे बीसीसीआयने पूर्ण वेळ प्रशिक्षकपदासाठी 20 जुलैपर्यंत अर्ज मागवले आहेत.
तसेच भारतीय महिला संघाच्या नवीन प्रशिक्षक निवडताना त्यांचे वय 55 पेक्षा कमी असावे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव असावा अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.
प्रभारी प्रशिक्षकपद सोपवण्यात आलेले रमेश पवार म्हणाले, “मला जी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी आनंदी आहे. मी महिला संघाला पुढे नेण्यासाठी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.”
या जबाबदारीविषयी रमेश पवारांना बीसीसीआयने रविवारी माहिती मिळाली होती. त्यांनी भारताकडून दोन कसोटी सामने खेळले असुन त्यात 6 विकेट्स मिळवल्या आहेत. याबरोबरच त्यांनी 31 वनडे सामनेही भारताकडून खेळले आहेत. त्यात त्यांनी 35.2 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर पवार यांना मागच्या आठवड्यात मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत मुंबईचे माजी यष्टीरक्षक फलंदाज विनायक सामंत यांनी मागे टाकले होते.
या पदासाठी पवार यांनाच पहिली पसंती होती. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापन समीतीचा एक ठराव त्यांच्या विरोधात गेला.
महत्त्वाच्या बातम्या:
–म्हणून जोकोविचच्या मुलाला पाहाता आली नाही विंबल्डनची फायनल!
–अजय देवगण आणि तुझे नाते काय? पोलार्डचा कृणाल पंड्याला प्रश्न