भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील सराव सत्रांमध्ये यापुढे चाहत्यांना येण्याची परवानगी मिळणार नाही. दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाच्या सरावादरम्यान काही प्रेक्षकांच्या ‘अशोभनीय’ कमेंटमुळे खेळाडू त्रस्त झाले होते. त्यामुळे बीसीसीआयनं हा निर्णय घेतला.
मंगळवारी भारतीय संघाचं सराव सत्र चाहत्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाचं सराव सत्र पाहण्यासाठी मर्यादित संख्येनं प्रेक्षक आले होते, मात्र भारतीय संघाचा सराव पाहण्यासाठी हजारो लोक जमले. ॲडलेडमधील सराव सुविधा प्रेक्षक गॅलरीच्या अगदी जवळ आहे, हे विशेष.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर ‘पीटीआय’ला सांगितलं की, “ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान 70 पेक्षा जास्त लोक आले नव्हते. परंतु भारतीय संघाच्या सत्रादरम्यान सुमारे 3000 लोक उपस्थित होते. इतके चाहते येतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. सिडनीमध्ये पाचव्या कसोटीपूर्वी आणखी एक ‘फॅन डे’ आयोजित केला जाणार होता, जो आता रद्द करण्यात आला आहे. येथे झालेल्या असभ्य आणि असंवेदनशील टिप्पण्यांमुळे खेळाडू खूप दुखावले आहेत.”
एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, चाहत्यांनी रोहित शर्मा आणि रिषभ पंतसारख्या खेळाडूंना षटकार मारण्यासाठी चिथावणी दिली. काही चाहत्यांनी संघातील खेळाडूंच्या फिटनेसवर असभ्य कमेंट्स केल्या. तो म्हणाला की, विराट कोहली आणि शुबमन गिलला अनेक लोकांनी घेरलं होतं. काही लोक त्यांच्या मित्रांसोबत फेसबुक लाईव्ह करत होते आणि फलंदाज खेळत असताना जोरात बोलत होते. एक चाहता एका खेळाडूला गुजरातीमध्ये ‘हाय’ म्हणण्याची विनंती करत होता. आणखी एकजण खेळाडूच्या शरीरावर असभ्य कमेंट करत होता.
ॲडलेड कसोटीनंतर मालिकेतील अखेरचे 3 सामने ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 7 जानेवारीला संपेल.
हेही वाचा –
फलंदाजांची ताजी कसोटी रँकिंग; यशस्वी-कोहलीला झटका, गिलचीही घसरण
“पाकिस्तानची मनमानी चालणार नाही”, बीसीसीआयचा आयसीसीला कडक संदेश
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! भारताला एकहाती जिंकवून दिला सामना