आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. शुभारंभ सामन्यात गतविजेता कोलकातासमोर बंगळुरूचे आव्हान असेल. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकणाऱ्या एका फलंदाजावर आयपीएलमधून 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या 26 वर्षीय विस्फोटक फलंदाजाने एक मोठा नियम मोडला, ज्यामुळे त्याला ही शिक्षा मिळाली. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुक आहे. (Harry Brook Ban Of IPL 2 Years) यंदाच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार होता, परंतु त्याने लीग सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील 2 वर्षांसाठी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून बंदी घातली आहे. बीसीसीआयने (BCCI) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) याबद्दल माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या नवीन धोरणानुसार, ब्रूक पुढील 2 वर्षे लिलावात सहभागी होऊ शकत नाही, कारण त्याने शेवटच्या क्षणी या आयपीएल हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
आयपीएलने लागू केलेल्या एका नवीन नियमानुसार, जो खेळाडू लिलावासाठी नोंदणी करतो आणि निवड झाल्यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी लीगमधून स्वतःला माघार घेण्याचा निर्णय घेतो त्याला स्पर्धा आणि लिलावातून 2 हंगामांसाठी बंदी घातली जाईल. राष्ट्रीय संघासोबतच्या त्याच्या वचनबद्धतेसाठी तयारी करण्याची गरज असल्याचे कारण देत ब्रूकने सलग दुसऱ्या हंगामात आयपीएलमधून माघार घेतली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगा लिलावात त्याला दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 6.25 कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या लिलावातही त्याला दिल्लीने 4 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
ब्रूकने एका निवेदनात म्हटले होते की, “मी आगामी आयपीएलमधून माघार घेण्याचा खूप कठीण निर्णय घेतला आहे. मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या समर्थकांची बिनशर्त माफी मागतो. मला क्रिकेट आवडते. लहानपणापासूनच मी माझ्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले आहे आणि या पातळीवर मला आवडणारा खेळ खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. माझ्यावर विश्वास असलेल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली, मी या निर्णयाचा गांभीर्याने विचार करण्यासाठी वेळ काढला आहे. इंग्लंड क्रिकेटसाठी हा खरोखरच महत्त्वाचा काळ आहे आणि मी आगामी मालिकेच्या तयारीसाठी पूर्णपणे वचनबद्ध राहू इच्छितो.”





