जेव्हाही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीचे दिवस जवळ येतात, तेव्हा बॉलिवूड किंवा क्रिडा क्षेत्रातून कोणत्या-ना-कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीच्या राजकारणात उतरण्याच्या चर्चा सुरू होतात. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर बऱ्याच क्रिकेटपटूंनी राजकारणाची वाट धरल्याची आपण पाहिले आहे. सध्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली हा राजकारणाची पायरी चढणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर खुद्द गांगुलीने त्याचे विचार मांडले आहेत.
‘दादा’ नावाने क्रिकेटविश्वात प्रसिद्ध असणारा गांगुली एंजिओप्लास्टीनंतर सध्या कोलकातामध्ये त्याच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहे. २७ मार्च ते २९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपुर्वी आपल्या नावाची चर्चे सुरू असल्याची माहिती त्याला आहे. विशेषकरुन, भारतीय जनता पार्टी (भाजपा) या पक्षात सहभागी होणार असल्याचे कयास लावले जात आहेत.
याबाबतीत इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला की, “बघू पुढे काय होईल? हेदेखील पाहावे लागेल की पुढे कशाप्रकारची संधी चालून येईल? त्यानुसार मी माझा पुढील निर्णय घेईल.”
माझे आयुष्य असेच राहिले आहे, कधीही, कीहीही
आपल्या जिवनातील चढ-उतारांविषयी बोलताना गांगुली म्हणाला की, “जेव्हा मी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनलो होतो, तेव्हा मला या पदाची अपेक्षा नव्हती. तेव्हा सचिन तेंडूलकर संघाचा कर्णधार होता. परंतु त्याने नेतृत्त्वपदाचा राजीनामा दिला आणि मी कर्णधार झालो. जर त्याने त्यावेळी नेतृत्त्वपद सोडण्याचा निर्णय घेतला नसता; तर कदाचित मी कधी कर्णधार बनलो नसतो.”
“अशाचप्रकारे मी बीसीसीआयचा अध्यक्ष बनण्याच्या काही मिनिटांपुर्वी मला कळाले की, माझ्या हाती हे पद सोपवण्यात येणार आहे. माझे आयुष्य असेच राहिले आहे. कोणत्याही वेळी, काहीही होते. त्यामुळे बघूयात राजकारणात प्रवेश करण्याबाबतीत काय घडेल,” असे शेवटी बोलताना गांगुलीने सांगितले.
दिंडा, तिवारी यांनी नुकताच केलाय राजकारणात प्रवेश
गांगुलीपुर्वी बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर राजकारण क्षेत्राची वाट धरली आहे. यात माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर, नवज्योत सिंग सिद्धू यांचा समावेश होतो. हल्लीचे उदाहरण घ्यायचे झाले तर, भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू लक्ष्मी रतन शुक्ला हे देखील तृणमुल काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. त्याचदिवशी माजी भारतीय क्रिकेटपटू अशोकक दिंडाने भाजपचे सदस्यत्त्व स्विकारले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मोदींना साथ देणार दिंडा! माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने केला बीजेपीत प्रवेश
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेलने खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात