भारतीय क्रिकेट संघ सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. टीम इंडियानं गेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये केवळ एकच विजय नोंदवला. प्रथम, न्यूझीलंड हा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला देश बनला, ज्यानं भारताला घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दहा वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. या पराभवामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आव्हान संपुष्टात आलं.
टीम इंडियाची ही खराब कामगिरी पाहता, जय शाह यांच्या जागी बीसीसीआयचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या देवजित सैकिया यांना मोठं पाऊल उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना नवीन संघ निवडण्याबाबत मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना कठोर आदेश जारी करण्याचा सल्ला दिला गेला. यानंतर आता भारतीय क्रिकेटमध्ये अनेक नवे बदल घडू शकतात.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वीच विराट कोहली आणि रोहित शर्मावर टीकेची झोड उठली होती. पर्थ कसोटीत कोहलीनं निश्चितपणे 100 धावांची शतकी खेळी खेळली. असं असूनही तो संपूर्ण मालिकेत केवळ 190 धावाच करू शकला. रोहित शर्माची अवस्था तर त्याहूनही वाईट होती. त्यानं 5 डावात केवळ 31 धावा केल्या. कर्णधार रोहितचा फॉर्म इतका खराब आहे की, सप्टेंबरपासून खेळल्या गेलेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं केवळ 164 धावा केल्या आहेत. परिणामी, त्याला सिडनी कसोटीतून बाहेर बसावं लागलं.
बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा 12 जानेवारीला होत आहे. त्याआधी एका मीडिया संस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्यानं सांगितलं की, “खूप चुकीचा संदेश जात आहे. बीसीसीआयला देशभरात क्रिकेट पुढे न्यायचं आहे. आता वेळ आली आहे. बीसीसीआयनं खेळाडूंना कठोर संदेश द्यायला हवा की, कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही. आता नवा संघ निवडण्याची गरज आहे. अजित आगरकर मुख्य निवडकर्ते आहेत. बीसीसीआयच्या नव्या सचिवांनी आगरकर यांना बोलावून कडक संदेश द्यायला हवा.”
भारतीय संघाला 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली मालिका खेळायची आहे. इंग्लंड संघाचा भारत दौरा 22 जानेवारीपासून सुरू होणार असून दोन्ही संघांमध्ये 5 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जातील. या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा –
“भांडतो विराट कोहली, पण संपूर्ण टीमला भोगावं लागतंय…”, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
2024 सालचा सर्वोत्तम कसोटी संघ, 3 भारतीय आणि एका पाकिस्तानी खेळाडूचा समावेश
या तीन कारणांमुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार