भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित करत असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच संपला. पूर्वनियोजनानुसार ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार होती. मात्र, कोरोना महामारीमुळे स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह लागले होते. अखेरीस, बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग काउंसिलच्या अथक प्रयत्नानंतर आयपीएलचा हा हंगाम युएई येथे पार पडला. युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करूनही बीसीसीआयला घसघशीत नफा झाल्याचे समोर आले आहे.
भारतात होणार होते आयपीएलचे आयोजन
आयपीएल ही बीसीसीआयच्या कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे बीसीसीआय दरवर्षी आयपीएल आयोजित करण्याचा प्रयत्न करत असते. तोट्यात चाललेल्या बीसीसीआयने, आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करण्याचा घाट घातला आणि तो यशस्वीही करून दाखवला. ऑगस्ट महिन्यात बीसीसीआयने सहभागी सर्व फ्रॅंचायझींना याची पूर्वकल्पना दिली होती.
यूएईमध्ये केले गेले आयपीएलचे आयोजन
आयपीएल २०२० चे सामने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईतील शारजाह, अबूधाबी आणि दुबईमध्ये खेळले गेले. एमिरेट्स क्रिकेट बोर्ड व बीसीसीआयने यशस्वीरित्या आयपीएलचे आयोजन करून तब्बल ४,००० कोटी रुपये कमावले. यावर्षीच्या आयपीएलमधून बीसीसीआयला विक्रमी व्ह्यूअरशिप देखील मिळाली. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी आयपीएल २०२० च्या यशस्वीतेबद्दल एका मुलाखतीत बोलताना बीसीसीआयने महामारीच्या काळात मिळवलेल्या रकमेचा खुलासा केला.
अरुण धुमाळ यांनी सांगितले की, “मागील आयपीएलच्या तुलनेत बोर्डाने सुमारे ३५ टक्क्यांची तूट भरून काढली. या महामारीच्या काळात आम्ही ४,००० कोटींची कमाई केली. आमची टीव्ही व्यूअरशिप जवळपास २५ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याला सर्वाधिक व्ह्यूअरशिप मिळाली होती. ज्यांना आमच्यावर शंका होती त्यांना आम्ही आयपीएलचे यशस्वी आयोजन करून दाखवले आहे. आयपीएल झाली नसती, तर क्रिकेटपटूंचे एक वर्ष वाया गेले असते.”
आयपीएलदरम्यान केल्या गेल्या ३०,००० कोरोना टेस्ट
धुमाळ यांनी पुढे सांगताना म्हटले, “आयपीएलच्या दीड महिन्याच्या काळात जवळपास ३०,००० कोविड टेस्ट केल्या गेल्या. आयपीएल २०२० आयोजनात १,५०० लोक प्रत्यक्षरीत्या सहभागी होते. आयपीएलच्या सुरुवातीला चेन्नईचे दोन खेळाडू व बीसीसीआयचा एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मात्र, कोविडचा एकही रुग्ण सापडला नाही.”
आयपीएल २०२० च्या यशस्वी आयोजनानंतर आता बीसीसीआय पुढील आयोजनाबाबत विचार करत आहे. आयपीएल २०२१ मध्ये दोन नवीन संघ समाविष्ट केले जाणार आहेत, अशी देखील चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ होणार अधिक रोमांचक, एका संघात खेळणार पाच विदेशी खेळाडू?
‘तो संघाचा सर्वोत्तम आणि विश्वासू फलंदाज’, वेस्ट इंडिजच्या दिग्गजाकडून सूर्यकुमारची प्रशंसा
आयपीएलमध्ये झिरो ठरलेला ‘तो’ भारताविरुद्ध ‘हिरो’ ठरण्यासाठी घेतोय कसून मेहनत