मुंबई । बीसीसीआयचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी राजीनामा दिल्यानंतर सबा करीमही बीसीसीआयमधील पद सोडणार आहेत. माजी भारतीय यष्टीरक्षक सबा करीम यांना बीसीसीआयने जनरल मॅनेजर पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.
भारताकडून एक कसोटी आणि 34 एकदिवसीय सामने खेळणारे 52 वर्षीय सबा करीम यांना बीसीसीआयने डिसेंबर 2017 मध्ये या पदावर नियुक्त केले होते. यासंदर्भात बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, परंतु करीम यांनी स्थानिक क्रिकेटसाठी केलेल्या योजनेवर ते समाधानी नसल्याचे कळते.
बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “सबा करीम यांस राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. यामागचे एक कारण म्हणजे कोविड 19 या साथीचा आजार पसरत आहे. या पार्श्वभूमीवर ते देशांतर्गत क्रिकेटसाठी ठोस योजना आखू शकलेले नाही. देशातील कोविड 19 प्रकरणांची संख्या सतत वाढत असल्याने डिसेंबरपूर्वी ‘डोमेस्टिक’ क्रिकेट सुरू होण्याची शक्यता कमी आहे.”
आयपीएल सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान होणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या दरम्यान देशांतर्गत क्रिकेट खेळता येणार नाही.
या महिन्याच्या सुरुवातीला बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.
सौरव गांगुली अध्यक्ष झाल्यानंतर मंडळाचे मुख्य वित्तीय अधिकारी संतोष रंगणेकर यांनीही गेल्या वर्षी राजीनामा दिला होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जोहरीच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राजीनाम्याबाबत बोर्डाच्या कोणत्याही अधिकार्याने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.