सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर हे दोन्ही संघ ५ सामन्यांची टी- २० मालिका खेळणार आहेत. आणि त्यांनतर ३ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. अशातच बीसीसीआयने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.
टी२० मालिकेसाठी निवड झालेल्या भारतीय संघातील काही खेळाडू सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा भाग आहेत, तर काही खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहेत. सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचे दोन्ही सामने आणि नंतर होणारी टी२० मालिका अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे टी२० मालिकेसाठी निवड झालेले आणि सध्या विजय हजारे ट्रॉफी खेळत असलेल्या खेळाडूंना टी२० मालिका सुरु होण्याच्या साधारण २ आठवडे आधीच अहमदाबादला पोहचावे लागणार आहे.
भारतीय संघात टी२० मालिकेसाठी निवड झालेल्या आणि विजय हजारे ट्रॉफी खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये शिखर धवन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल तेवतीया, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, टी नटराजन यांचा समावेश आहे. ही ५ सामन्यांची टी२० मालिका असून यासाठी १९ जणांचा संघ निवडण्यात आला आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवनला इतर खेळाडूंसह १ मार्चला अहमदाबादमध्ये दाखल होण्यास सांगितले आहे. तसेच सर्व क्रिकेपटूंना विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत २ ते ३ सामने खेळण्याची परवानगी देण्यात आली होती, जेणेकरून त्यांना फॉर्ममध्ये येता येईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी -२० मालिका १२ मार्च पासून सुरु होणार असून २० मार्चला शेवटचा सामना खेळवला जाईल. या मालिकेतील सर्व ५ सामने मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत.
कसोटी मालिकेत सध्या बरोबरी
सध्या सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना इंग्लंड संघाने जिंकला होता तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला होता. कसोटी मालिकेत दोन्ही संघ पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ च्या बरोबरीत आहे. आता तिसरा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना २४ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.
टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या कॉनवे, सोधीची शानदार कामगिरी, न्यूझीलंडल मिळवून दिला विजय
वयाच्या चाळिशीत असलेल्या दिग्गजाने ‘अशी’ उडवली फलंदाजाची दांडी, पाहा त्याच्या ‘बुलेट थ्रो’चा व्हिडिओ