कोणत्याही क्रिडा प्रकारात खेळाडूची फिटनेस (तंदुरुस्ती) खूप महत्त्वाची असते. त्यातही सध्याच्या युगात क्रिडा क्षेत्रात फार वेगाने प्रगती होत आहे. त्यामुळे व्यस्थ वेळापत्रक आणि प्रतिस्पर्धांदरम्यान स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे, हे खेळाडूंसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे. असे असले तरी, बरेच खेळाडू आपल्या तंदुरुस्तीबाबत सतर्क असल्याचे दिसून येते. भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना संघात सहभागी होण्यापुर्वी यो-यो टेस्ट ही तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागते. मात्र आता बीसीसीआयने नवी तंदुरुस्ती चाचणी घेण्याचे ठरवले आहे.
काय आहे ‘टाइम ट्रायल टेस्ट’ ?
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुरू केलेल्या नव्या तंदुरुस्ती चाचणीचे नाव ‘टाइम ट्रायल टेस्ट’ असे आहे. त्यांनी भारतीय संघाशी करार केलेल्या सर्व खेळाडूंना इथून पुढे यो-यो टेस्टबरोबर टाइम ट्रायल टेस्टही उत्तीर्ण करण्याची अट घातली आहे. या नव्या चाचणीद्वारे खेळाडूंचा धावण्याचा वेग आणि त्यांची सहनशक्ती पातळी तपासली जाईल. या चाचणीत खेळाडूंना कमीतकमी वेळेत २ किलोमीटर अंतर पार करावे लागणार आहे.
वेगवान गोलंदाजांसाठी कमी कालावधी
टाइम ट्रायल टेस्ट उत्तीर्ण करण्यासाठी वेगवान गोलंदाजांना इतरांपेक्षा कमी कालावधी देण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजांना ही चाचणी ८ मिनिटे १५ सेकंदात पूर्ण करावी लागणार आहे. तर फिरकी गोलंदाज, फलंदाज आणि यष्टीरक्षणांना ८ मिनिटे ३० सेंकद दिले जातील. जरी या नव्या तंदुरुस्ती चाचणीची भर पडली असेल, तरी खेळाडूंना याबरोबरच ठराविक वेळेत यो-यो टेस्ट पूर्ण करावी लागली आहे.
यासंदर्भात बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले की, “बोर्डाला एका वेगळ्या पातळीवर नेण्यासाठी फिटनेस स्टँडर्डने मोठी भूमिका बजावली आहे. सध्याच्या युगात तंदुरुस्तीला एका वेगळ्या पातळीवर नेणे खूप महत्त्वाचे आहे. टाइम ट्रायल टेस्टमुळे खेळाडूंच्या प्रदर्शनात प्रगती होणार आहे. बोर्ड दरवर्षी फिटनेस स्टँडर्ड वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.”
बीसीसीआय अध्यक्षाने दाखवलाय हिरवा झेंडा
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी टाइम ट्रायल टेस्टला संमती दिली असून खेळाडूंना यासंदर्भात माहिती दिली आहे. बोर्डाचे असे म्हणणे आहे की, यावर्षी फेब्रुवारी, जून आणि ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या चाचणीसाठी वेगळा कालावधी काढण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
जोश मे खोया होश! कसोटी मालिका विजयाच्या आनंदात रोहितच्या तोंडून निघाले अपशब्द, व्हिडिओ व्हायरल