भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी १५ मार्च खास दिवस असणार आहे. या दिवशी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये अनेकांना विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. नमन पुरस्कार २०२६ याने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमामध्ये भारतीय वनडे-कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि राहुल द्रविड यांना सन्मानित केले जाणार आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून दिलेल्या महत्वाच्या योगदानाबद्दल बीसीसीआयकडून दिग्गज फलंदाज आणि भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक द्रविड यांना कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच गिलला त्याच्या फलंदाजीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला जाणार आहे.
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्या महिला क्रिकेटवरील प्रभावाचा गौरव करण्यासाठी बीसीसीआय तिला आजीवन सन्मान देणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी मुंबईच्या आयुष म्हात्रेला लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
द्रविड हे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या भारताच्या मुख्य फलंदाजी चौकडीमधील एक भाग राहिले आहेत. ते त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज राहिले. त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठला आहे. त्याचे टोपणनाव ‘द वॉल’ असे असून ते कसोटीमधील घरच्या आणि बाहेरच्या मैदानावरील उत्तम कामगिरीसाठी ओळखले जातात.
द्रविड यांनी २०१२ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही काळ कमेंट्री (समालोचन) केले. त्यांनतर त्यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. त्याच्या प्रशिक्षणादरम्यान भारताने २०१८मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. २०२१ मध्ये ते वरिष्ठ भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले. तसेच त्यांच्या प्रशिक्षणावेळी भारताच्या वरिष्ठ संघाने २०२४मध्ये टी२० विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
गिलसाठी २०२५ वर्ष उत्तम राहिले. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने इंग्लंड दौऱ्यात ५ कसोटी सामने खेळताना ७५४ धावा केल्या होत्या. त्याने २०२५ मध्ये भारताकडून क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये ७ शतकांसह १७६४ धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशनला स्थानिक क्रिकेटमधील सर्वोत्तम असोसिएशन म्हणून सन्मानित केले जाणार आहे.






