भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)चे कार्यालय सध्या मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर आहे. परंतु देशाची राजधानी दिल्लीतही नवीन कार्यालय सुरू करण्याचा बोर्ड विचार करत आहे. त्यामुळे दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये लवकरच बीसीसीआयचे एक नवीन कार्यालय सुरू होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोमवारी (१५ मार्च) अरुण जेटली स्टेडियमला भेट दिली. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली यांची भेट घेऊन स्टेडियमवरील सुविधांचा आढावा घेतला. याशिवाय आगामी आयपीएल सामन्यांच्या तयारीबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार सूत्रांनी माहिती दिली आहे की, बीसीसीआय दिल्लीमध्ये नवीन कार्यालय सुरू करण्याचा विचार करीत आहे. दिल्लीतील अरुण जेटली या स्टेडियमवर बीसीसीआयने आपले नवीन कार्यालय सुरू करावे, असा प्रस्ताव डीडीसीएने बीसीसीआयकडे ठेवला होता. यासाठी डीडीसीए सर्व आवश्यक वस्तू पुरवणार असल्याचे सांगितले जात आहे.
जेव्हा अनुराग ठाकूर बीसीसीआयचे अध्यक्ष होते तेव्हा दिल्लीतील जनपथ या ठिकाणी बीसीसीआयचे कार्यालय होते. त्यानंतर जेव्हा सीके खन्ना बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष झाले, त्यांनीही त्या कार्यालयातून काम केले आणि नंतर ते कार्यालय दक्षिण दिल्लीत हलवले गेले. त्यांना हटवल्यापासून दिल्लीत बीसीसीआयचे कोणतेही कार्यालय नाही.
बीसीसीआयचे सध्याचे मुख्य कार्यालय मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आहे. परंतु दिल्लीतही त्यांना कार्यालय सुरू करावयाचे आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय दिल्लीत कार्यालय उघडण्यासाठी डीडीसीएकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर विचार करणार आहे. जर सर्व काही ठीक राहिले तर या वर्षात किंवा येत्या वर्षात दिल्लीतही बीसीसीआयचे कार्यालय सुरू होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोहली-डिव्हिलियर्स मध्ये चालू असलेल्या वादविवादात देवदत्त पडीक्कलची उडी
हार्दिक पंड्याकडून पाकिस्तानच्या ‘या’ १७ वर्षीय क्रिकेटरला मिळाली बॅट भेट
वनक्कम चेन्नई! मुंबई इंडियन्स चेन्नईत पोहचताच रोहितचे तमिळ भाषेत अभिवादन, पाहा व्हिडिओ






