भारतात होणाऱ्या क्रिकेट मालिकांच्या प्रक्षेपणासाठी इ- लिलावाची आज सांगता झाली. हे हक्क ६१३८ कोटीला विकले गेले आहेत. या लिलावात कोणी बाजी मारली याबद्दल आज संध्याकाळी ५ वाजता बीसीसीआय घोषणा करणार आहे.
हा लिलाव मागील तीन दिवस सुरु होता. आज त्याचा शेवटचा दिवस होता. आज सकाळी ११ वाजता हा लिलाव सुरु झाला. यात तीन दिग्गज कंपन्यांनी भाग घेतला असून या लिलावात कोणी माघार घेतली नव्हती.
हा लिलाव भारतीय क्रिकेट बोर्डाच्या द्विपक्षिय मालिकांसाठीच्या डिजीटल प्रक्षेपणासाठी एप्रिल २०१८ ते मार्च २०२३ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.
पहिल्या दिवशी ४४४२ कोटींवर संध्याकाळी ६ वाजता हा लिलाव बंद झाला होता तो काल ६०३२.५० कोटींवर आला आहे.
यात स्टार इंडिया, जिओ आणि सोनी या आघाडीच्या कंपन्यांनी भाग घेतला आहे.
२०१२ रोजी स्टार टीव्हीने ३८५१ कोटींची बोली लावत प्रसरणाचे हक्क २०१२ ते २०१७ साठी मिळवले होते.
भारतात होणाऱ्या १०२ सामन्यांसाठी ही लिलाव प्रक्रिया झाली. यात जागतिक टीव्ही प्रसारण अधिकार, भारतातील प्रसारणाचे अधिकार, अशिया खंडातील प्रसारणाचे अधिकार तसेच डिझीटल अधिकारांचाही समावेश आहे.