मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या स्पर्धा अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेली बीसीसीआय मात्र कोणत्याही परिस्थितीत आयपीएलचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. आयपीएलच्या नियोजनासाठी अनेक उपायांचा विचार केला जात आहे. यंदा आयपीएलची स्पर्धा झाली नाही तर चार हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
बीसीसीआय हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आयपीएल भरविण्याच्या विचारात आहे. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय यंदाही आयपीएल देशाबाहेर आयोजन करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयने यापूर्वी 2009 साली दक्षिण आफ्रिका आणि 2014 साली यूएई येथे आयपीएलचे आयोजन केले होते. याही वर्षी आयपीएलचे आयोजन देशाबाहेर केल्यास आयपीएल स्पर्धा तिसऱ्यांदा देशाबाहेर होतील.
29 मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या मोसमाला सुरुवात होणार होती. पण कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन यांच्या तारखांमध्ये सतत बदल होत राहिले शेवटी ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान आयसीसी ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेवर 10 जून रोजी अंतिम निर्णय घेणार आहे. जर ही विश्वचषक स्पर्धा रद्द झाली तर आयपीएल भरविण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.